कोल्हापूर : दरवर्षी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती अशा उत्साही, आनंदी वातावरणामध्ये दीक्षांत समारंभ होतो. विद्यापीठ कॅम्पस गर्दीने फुललेला असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवाजी विद्यापीठाने पारंपारिक पध्दतीला छेद दिला. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच ५७ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. त्यामुळे दीक्षांत समारंभ असूनही मुख्य इमारत वगळता अन्य परिसरात शुकशुकाट पसरला होता. दीक्षांत विभागाकडून सर्व ७७,५४२ स्नातकांना पोस्टाव्दारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत.विद्यापीठात मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता दीक्षांत मिरवणूक सुरू झाली. कुलगुरू कार्यालयापासून राजर्षी शाहू सभागृहामध्ये ती मिरवणूक आली. त्यामध्ये ह्यज्ञानदंडह्ण घेवून परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे होते. त्यासह कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि अन्य अधिकारी, अधिष्ठाता होते.
कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून समारंभ पार पडला. त्याचे शिववार्ता युट्युब वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. हा कार्यक्रम ६९०६ जणांनी पाहिला. दरम्यान, दरवर्षी विद्यापीठातील शिवपुतळा परिसर, दीक्षांत समारंभ सभागृह, परीक्षा भवन, ग्रंथालय परिसर, आदी ठिकाणे विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून जातात. कोरोनाची धास्ती आणि ऑनलाईन समारंभामुळे मंगळवारी या परिसरात शुकशुकाट पसरला होता.