नारायणगाव : जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवणक्षेत्र आहे. दररोज शेतक-यांच्या पशुधनाबरोबरच नागरिकांवरही हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच गेल्या आठवड्यात बिबट्याच्या हल्यात खानेवाडी येथे चार महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चक्क बिबट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबट्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. येडगाव हद्दीतील खानेवाडी येथे बिबट्याच्या हल्ह्यात चार महिन्याच्या कल्याणी सुखदेव झिटे हीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कल्याणी हिचे नातेवाईक धोंडीभाऊ विठ्ठल झिटे (वय ३७, व्यवसाय-मेंढपाळ रा जांबूत, ता़ संगमनेर जि अहमदनगर सध्या रा़ नांदूर ता़ संगमनेर जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे़. नारायणगावपोलिसांनी फिर्याद घेवून बुधवारी (दि२३) गुन्हा दाखल केला आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार येडगाव पसिरातील खानेवाडी येथे बुधवारी (दि २३) पहाटे ३ च्या सुमारस कल्याणी ही शेतामध्ये मेढ्यांच्या पालामध्ये झोपली होती. यावेळी बिबट्याने तिला उचलून नेले. चा रडण्याचा आवाज आल्याने तिची आई जागी झाली. तीने आरडा ओरड करत बिबट्याचा पाठलाग केला़ मात्र, बिबट्याने तिला चावल्याने तिचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे हे करीत आहेत़ या प्रकरणात घटनास्थळी काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही असा देखील शेरा मारण्यात आला आहे़. बिबट्या हा वन्य प्राणीजीव वर्गात येतो़ . वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचे सर्व पंचनामे वन विभागामार्फत केले जातात़. त्यामुळे पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची तरतूद नसल्याचे सर्वश्रृत आहे़. मात्र, नारायणगाव पोलिसांनी धोंडीभाऊ झिटे यांची फिर्याद घेवून बिबट्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने अशा प्रकारचा गुन्हा प्रथमच दाखल होत आहे़. दरम्यान, झिटे यांच्यावर ज्या परिसरात हल्ला झाला. त्या परिसरात वन विभागाने पिंजरा लावून बिबटयाला जेरबंद केले आहे़. हा बिबट्या नरभक्षकच असावा असा कयास वनविभागाच्या वतीने केला जात आहे़ मात्र स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत साशंका आहे. कारण या आणखीन काही बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही़. ........................खानेवाडी येथील घटनेचा आम्ही प्रत्यक्ष घटना स्थळी जाऊन पंचनामा केला होता. या मुलीचा मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाला असे प्राथमिक तपासणीत आढळले होते. तसेच शवविच्छेदनाच्या अहवालातही हे सिद्ध झाले होते. या प्रकरणी वनभागातर्फे संबंधित कुटुंबीयांना मदत म्हणून ३ लाख रूपयांचा धनादेशन दिला आहे. या घटनेचा तपास वनविभागामार्फेत होणे अपेक्षित आहे. एखाद्याच्या मृत्यू प्रकरणी बिबट्यावर गुन्हा दाखल होणे ही पहिलीच वेळ आहे. डॉ. अजय देशमुख, बिबट्या निवारा केंद्र, माणिकडोह
पहिल्यांदाच घडलं !...बिबट्यावर गुन्हा दाखल : खानेवाडीतील मुलीचा मृत्यू प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 7:41 PM
येडगाव हद्दीतील खानेवाडी येथे बिबट्याच्या हल्ह्यात चार महिन्याच्या कल्याणी सुखदेव झिटे हीचा मृत्यू झाला होता.
ठळक मुद्देप्राण्यावर गुन्हा दाखल होण्याची पहिलीच घटना नारायणगाव पोलिसांतर्फे तपास सुरू