- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)
केंद्र सरकारने खरीप पिकाच्या हमीभावात वाढ केल्याने राजस्थानहून येणाऱ्या बाजरीचे भाव २०० रुपयांनी वाढले. हंगाम सुरू होताच बाजरी २ हजार रुपये प्रतिक्विंटल विकत असल्याची ही मागील १० वर्षांतील पहिलीच वेळ ठरली आहे; मात्र मराठवाड्यातील बाजरीला अडत बाजारात १२५० ते १८०० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळत आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने खरीप २०१८-१९ साठी १४ पिकांच्या हमीभावात वाढ केली होती. यात बाजरीचाही समावेश आहे. पूर्वी १४२५ रुपये हमीभाव होता, त्यात ५२५ रुपयांची वाढ करून १९५० रुपये प्रतिक्विंटल बाजरीला भाव देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यात राजस्थानहून मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक होत असते; मात्र यंदा उत्पादन कमी असल्याने बाजरीच्या भाववाढीला बळ मिळाले आहे. राजस्थानची बाजरी ठोक व्यापाऱ्यांना १९५० रुपये प्रतिक्विं टल औरंगाबादपोच मिळत आहे. मागील आठवड्यात राजस्थानहून ५० टन बाजरीची आवक झाली.
यंदा औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने त्याचा बाजरीच्या उत्पादनावर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला आहे. नवीन बाजरी तुरळक प्रमाणात जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊ लागली आहे. आडत खरेदीत १२५० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. किरकोळ विक्रीत २२ ते २५ रुपये प्रतिकिलो भाव बाजरीचा आहे. थंडी पडल्यानंतर बाजरीला आणखी मागणी वाढेल. राजस्थाननातील बाजरीला हमीभावापेक्षा जास्त किंमत येथे मिळत आहे; पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाजरीलाही हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत नसल्याने बाजरी उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर आहे.दसरा, दिवाळी सणाची मागणी लक्षात घेता हरभरा डाळीच्या भावात क्विं टलमागे ३०० ते ४०० रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे. सध्या हरभरा डाळीला मोठी मागणी आहे.
औरंगाबादेत जालना व अकोला जिल्ह्यातून हरभरा डाळीची आवक असते. मागील आठवड्यात सुमारे १८० टनापेक्षा अधिक हरभरा डाळ शहरात विक्रीला आली. ४५०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारी हरभरा डाळ शनिवारी ४८०० ते ५१२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विक्री झाली.मागील आठवड्यात नवी दिल्लीतून नवीन डुप्लिकेट बासमती तांदळाची आवक सुरू झाली.
यातही अनेक व्हरायटी असल्याने ३२०० पासून ते ८ हजार प्रतिक्ंिवटलपर्यंत तांदूळ विक्री होत आहे. तांदळाचे विक्रेते नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, मागील आठवड्यात सुमारे ५० ते ६० टन जुना व नवीन डुप्लिकेट बासमती बाजारात आला. या बासमतीमध्येही ५० पेक्षा अधिक व्हरायटी आहेत. जुना डुप्लिकेट बासमती ३५०० ते ८५०० रुपये प्रतिक्विं टल विक्री होत आहे, दिवाळीपर्यंत नवीन तांदळाच्या बहुतांश व्हरायटी बाजारात येतील, असे तांदळाच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.