सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं प्रत्येक शिवप्रेमीचा उर अभिमानानं भरून येतो. यंदाच्या शिवजयंतीला रविवारी देशाच्या राजधानीत प्रथमच मोठ्या थाटात शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने विशाल रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये दिल्लीतील मूळ सातारकरांसह दोनशेहून अधिक रक्तदाते सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदीप पाटील यांनी दिली. दिल्लीतील मराठी बांधवांना एकत्र करण्याचे काम सांगली जिल्ह्यातील विटा येथील प्रदीप पाटील यांनी केले आहे. प्रदीप पाटील यांचा दिल्लीत व्यवसाय आहे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने असंख्य मराठा तरुण एकत्र आले. स्पर्धा परीक्षेसाठी मोठ्या संख्येने मराठी तरुण दिल्ली राहतात; परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे जेवणाचे हाल होतात. ही समस्या दूर करण्यासाठी प्रदीप पाटील यांनीच ‘मराठी कट्टा’ नावाचे हॉटेल सुरू केले. या ठिकाणी काही होतकरू मराठी तरुणांना नाममात्र दरात जेवण दिले जाते. या सर्वांच्या विचारातून सकारात्मक उपक्रमाने शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना पुढे आली. ‘मराठी कट्टा’ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दिल्लीचे डीसीपी व मूळचे महाराष्ट्राचे असलेले मिलिंद डुंबरे यांच्या हस्ते अभिवादन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सोशल मीडियावरून जागृतीदिल्लीत मराठी माणसं मोठ्या संख्येने असले तरी ते आपापल्या क्षेत्रात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना या उपक्रमाची माहिती देण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप यासारखी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला आहे. तसेच फ्लेक्स बोर्डही दिल्लीच्या रस्त्यावर झळकत आहेत.
देशाच्या राजधानीमध्ये आज प्रथमच शिवजयंती सोहळा
By admin | Published: February 19, 2017 12:15 AM