पुढील पाच महिन्यांत ४२ विवाह मुहूर्त
राम देशपांडे, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ३ - येत्या १२ नोव्हेंबरपासून लग्नसराईला प्रारंभ होत असून, पुढील पाच महिन्यांत ४२ लग्नतिथी असल्याने विवाहोच्छुक वधू-वरांसाठी हा स्वप्नपूर्तीचा काळ ठरणार आहे. पहिला मुहूर्त अठरा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेत दिवाळीपूर्वीच लग्नाच्या खरेदीसाठी धूम सुरू झाली आहे. वधू-वरांच्या कुटुंबीयांप्रमाणे व्यापाºयांचेदेखील लग्नसराईकडे लक्ष लागले आहे.
शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह समाप्ती आहे. त्यानंतर लगेचच १२ नोव्हेंबरपासून ‘शुभमंगल सावधान’चे सूर सर्वत्र घुमणार आहेत. सकाळी १०.२७, १०.५४ व सायं. ५.३४ असे तीन मुहूर्त १२ नोव्हेंबरला आहेत. पंचांगामध्ये नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ या पाच महिन्यांच्या कालावधीत ४३ लग्नतिथी देण्यात आल्या आहेत. यातही डिसेंबर २०१६ आणि फेबु्रवारी २०१७ या दोन महिन्यांत सर्वाधिक लग्नतिथी आहेत. विवाहकार्य असलेल्या कुटुंबीयांना दिवाळीप्रमाणेच लग्नसराईचे वेध लागले असून, विवाहकार्यानिमित्त खरेदी तसेच इतर कार्यांना धामधुमीने सुरुवात झाली आहे.
असे आहेत विवाह मुहूर्त...
नोव्हेंबर २०१६ - १२, १६, २१, २३, २५, २६
डिसेंबर २०१६ - १, ३, ४, ५, ६, ८, १४, १८, १९, २०, २३, २४
जानेवारी २०१७ - १७, १८, १९, २०, २३, २४, २९
फेब्रुवारी २०१७ - १, २, ३, ५, ६, १३, १४, १६, १७, १९, २८
मार्च २०१७ - १, ६, १४, १५, १६, १८
नवदाम्पत्याला सुखी-समाधानी जीवन जगता यावे, यासाठीच मुळात विवाह मुहूर्त काढला जातो. पत्रिकेत त्याबाबत नमूददेखील केले जाते. असे असतानासुद्धा विवाह मुहूर्त टाळण्याची वेगळीच प्रथा आता रूढ होत चालली आहे.
- मंगेश पारगावकर गुरुजी, अकोला.