ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ : प्रेषकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. सैराट सिनेमाने तिकिट खिडकीवर पहिल्या आठवड्यात तब्बल २५ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात कुठल्याही मराठी सिनेमाचीही सर्वाधिक कमाई आहे. सैराट हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच फार चर्चेत होता. चित्रपटातील गाणी, ट्रेलर यांची झिंग प्रेक्षकांवर चढल्यामुळे सिनेमागृहाच्या बाहेर प्रेक्षकांनी अॅडव्हान्स बुकिंगसाठी रांगा लावल्या होत्या. तीन दिवसांपूर्वीच चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले , आठवडाभराची तिकिटे बुक झाली होती. ही परिस्थिती फक्त पुणे-मुंबईपुरतीच मर्यादित नव्हती, तर राज्यभरात सैराटला हाच रिस्पॉन्स मिळत होता.
अगदी खेड्यापाड्यात कधी सिनेमागृहात न गेलेला माणूसही आज सैराट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर जात आहे. सैराटचे पहिल्या दिवशीच जबरदस्त ओपनिंग मिळाले अन् या सिनेमाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. सैराट महाराष्ट्रात ९८० ते १,२०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ४.२३ करोड, तर दुसऱ्या दिवशी ५.१० करोड अन् तिसऱ्या दिवशी ६.५० करोड व चौथ्या दिवशी ३ करोड, असे तीन ते चार दिवसांचेच कलेक्शन जवळपास १५ ते १९ करोडपर्यंत होते. सैराटची ही घोडदौड पाहता, आतापर्यंतचे मराठी इंडस्ट्रीतील सर्र्व रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे. तरुणांवर सैराटची झिंग एवढी चढली आहे, की थिएटरमध्ये पुन:पुन्हा हा चित्रपट पाहिला जात आहे.
सैराट हा नागराज मंजुळेचा दुसरा चित्रपट. सैराट आणि फँड्री या दोन्हीचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही. पण या दोन्ही चित्रपटांचे शेवट हा दोन्हीतला सामायिक धागा आहे. या दोन्हीत 'नागराज टच' आहे. सैराट ही गोष्ट आहे अर्ची आणि परशाची. एका गावात राहणारे एकमेकांच्या प्रेमात पडतात. अर्ची एका श्रीमंत घराण्यात राहणारी तर परशा अत्यंत गरीब घरात जन्मलेला. या दोघांच्या प्रेमाला त्यांच्या परिवाराचा विरोध आहे. समाजही या दोघांच्या नात्यांना स्वीकारत नाही. आज समाज प्रगती करतोय. जग पुढे चाललंय. विचारसरणी बदलतेय. अनेक जुन्या रुढी परंपरा मागे टाकून प्रगतीच्या दिशेनं प्रत्येक जण वाटचाल करतोय.. अशातच गरीब श्रीमंत, जात- पात, धर्मांच्या नावावर आजही भेद भाव करणारी मानसिकता अस्तित्वात आहे हे या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी नटसम्राटने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा नटसम्राट 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. दुसरीकडे कट्यार काळजात घुसली या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या लय भारीने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता.
सैराट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तिकिट खिडकीवर केलेली झिंगाट गर्दीचे ऑनलाइन लोकमतच्या प्रतिनिधीने केलेले छायाचित्रण