ऑनलाइन लोकमत
दापोली, दि. 30 - कोकणातील पहिली मेजर बनण्याचा बहुमान मिळवणारी दापोलीतील मेदिनी चव्हाण ही वीरांगना विश्व शांतीचा झेंडा डौलाने फडकावत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय शांती सैन्यामध्ये त्या सध्या सुदानमध्ये शांती दूताची भूमिका बजावत आहेत. हा बहुमान मिळवणारी ती कोकणातील पहिलीच महिला आहे.भारत हा युनोचा संस्थापक सभासद आहे. निरनिराळ्या प्रदेशात उद्भवणा-या तंट्याचे निराकरण करण्याच्या युनोच्या योजनेचा भारत खंदा समर्थक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर युनोच्या शांततेच्या मोहिमेमध्ये आपले मोठे सैन्य पाठवणारे भारत जगातले दुस-या क्रमांकाचे राष्ट्र आहे. युनोच्या शांतता राखण्याच्या योजनेमध्ये सैनिकी अधिका-यांना फक्त बळाचा वापर करून शांतता राखावयाची नसते, तर आपली सम्यक वृत्ती, शिस्त, जबाबदारी, मानवी जीवनासाठी आदर आणि त्याचा मानसन्मान या गुणांचा वापर करावा लागतो.धाडस, कर्तव्यदक्षता, झोकून देऊन काम करण्याचा स्वभाव, दूरदृष्टी, नियोजन आणि कामामध्ये स्वतःचा संपूर्ण सहभाग यासारख्या सद्गुणाच्या बळावर मेदिनीची या युनोच्या आंतरराष्ट्रीय शांती सैन्यामध्ये निवड झाली आहे. त्यात केवळ गुणवत्तेच्या आधारावरच भारतीय सैन्यातील अधिका-यांची निवड केली जाते. मेजर मेदिनीने लष्करी सेवेमध्ये पर्वतमय प्रदेशापासून ते वाळवंटापर्यंतच्या आणि काश्मीरसारख्या अतिथंड व संवेदनशील प्रदेशात आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला आहे.दहावीपर्यंत शिक्षण दापोलीतमेदिनीचे दहावीपर्यंतचे शिक्षण दापोली येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले, तिने शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध उपक्रमांमध्ये पारितोषिके प्राप्त केली आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेतील विशेष नैपुण्याबद्दल पुणे विद्यापीठाने तिचा सन्मान केला. अंतराळ शास्त्र या विषयात ती एमएससी करत असतानाच 2007 साली तिची संरक्षणदलात निवड झाली. स्टाफ सिलेक्शन बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या देशपातळीवरील परीक्षेत तिने देशात तिसरा क्रमांक पटकावला. ही परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते.सन 2007 पासून अरुणाचल प्रदेशातील टेंगा व्हॅली आर्मी युनिटमध्ये लेफ्टनंट या पदावर कार्यरत असलेल्या मेदिनी यांना 2009 मध्ये कॅप्टनपदी बढती मिळाली. 2013 पासून बारामुल्ला येथे सेवा बजावली. 2014 साली मेजरचे प्रमोशन मिळाले. मेदिनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेलाय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुदान येथील शांतता मोहिमेमध्ये भारतीय लष्कराची प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. चव्हाण कुटुंब तसे रत्नागिरी नजीकच्या शिरगावचे तिचे वडील मधुकर चव्हाण व आई अलका या दापोली कृषी विद्यापीठावर कार्यरत होत्या. दोघेही सेवानिवृत्त झाले असून दापोलीतच स्थायिक झाले आहेत.