अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची निर्धार सभा घेतली होती. यामध्ये त्यांनी शरद पवार गटावर तोंडसुख घेतले होते. यामध्ये शरद पवार, पक्षाचे नेते आणि जयंत पाटील यांच्यासह आव्हाड, रोहित पवार आदींवरही आसूड ओढले होते. पक्षात कामे होत नव्हती, कार्यकर्त्यांवर अन्याय होत होता या मुद्द्यावर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके समोर आले आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर टीका केली आहे.
2019 ला मी चौथ्यांदा निवडून आल्याने मला अपेक्षा होती की मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळेल. परंतू ती मिळू शकले नसल्याने राजकीय निराशा मनामध्ये आली होती. मी आमदार पदाचा राजीनामा तयार करून अध्यक्ष महोदयांकडे देणार होतो. परंतु जयंत पाटील, अजितदादा ,धनंजय मुंडे या सहकाऱ्यांनी सांगितले राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन चर्चा करू आणि मग अध्यक्षांकडे जाऊ. याचाच काल उल्लेख अजितदादा यांनी केला आहे, असे सोळंके म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
मी म्हणालो तुम्हाला जमले तर मला मंत्रीपद द्या, नाहीतर पर्यायी मला काम करण्याची संधी द्या. यावर तुमची एक वर्ष तातडीने कार्याध्यक्ष पदाची निवड करतो, एक वर्ष अनुभव घ्या आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सांभाळा, असे अजित पवार व जयंत पाटलांनी मला सांगितलेले. परंतु जेव्हा मी जयंत पाटील, शरद पवार ,अजित पवार यांच्याकडे वारंवार आठवण करून दिली, त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही. कार्यकर्त्यांवर कसा अन्याय होतो हे अजित पवार यांनी शिबिरात सांगितले आहे, असे सोळंके म्हणाले.
जयंत पाटील हे साफ खोटे बोलत आहेत, त्यांनी स्वतःहून मला शब्द दिला होता. त्यावेळी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते मंत्री होते. जयंत पाटील यांच्याकडे हेवी खात असल्याने तिकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे होते. परंतु दुसऱ्याला मंत्री होऊ द्यायचे नाही अन् प्रदेशाध्यक्ष पदही द्यायचे नाही. दोन्ही पदे त्यांना पाहिजे होती. कशाला हवी होती असा सवाल करत दुसऱ्यांना फुकट सल्ले द्यायला काय जातेय जेव्हा जबाबदारी होती त्यांनी तेव्हा करायला पाहिजे होते, असे सोळंके म्हणाले.
तीन पक्षांचे सरकार आहे, मंत्रीपदे कमी आहेत. अजितदादा सर्व जातीधर्मीयांना न्याय देत आहेत त्यामुळे मला मंत्रीपद देऊ शकले नाहीत. मात्र त्यामुळे मी काही नाराज नाही. मी पक्षा सोबतच आहे. मला जयंत पाटील यांच्या गणिताबद्दल विश्वास नाही. जयंत पाटील खरे तर ते माझे जवळचे नातेवाईक आहेत मी त्यांच्याबद्दल अधिक काही वाईट बोलू इच्छित नाही. जयंत पाटील यांचा प्रश्न पेंडिंग ठेवायचे, प्रलंबित ठेवायचे आणि मजा बघत बसायची असा त्यांचा स्वभाव असल्याचा आरोपही सोळंके यांनी केला.