ऑनलाइन लोकमत
मालवण, दि. १२ - मालवण मेढा-राजकोट समुद्रात शुक्रवारी सकाळी मच्छिमारांची होडी बुडल्याची घटना घडली आहे. सकाळी वाऱ्यांचा वेग कमी असल्याने गुरू जोशी यांच्या मालकीच्या 'भद्रकाली' होडीतून लिलाधार जोशी व काका चिंदरकर हे मासेमारीस गेले होते. यावेळी आलेल्या मोठ्या लाटेच्या तडाख्यात ती पलटी झाली. यात असलेल्या दोन मच्छीमाराना त्यांच्या पातीलगत मासेमारी करत असलेल्या दांडी येथील जगदीश तोडणकर यांच्या पातीतील मच्छीमारांनी वाचवत त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.
मात्र सात ते आठ वाव खोल समुद्रात बुडालेली पात काही काळ खडकात अडकल्याने जाळी व इंजिनचे नुकसान झाले. स्थानिक मच्छीमार व नागरिकांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर फायबर पात किनाऱ्यावर आणण्यात यश मिळविले. या घटनेत जाळी व इंजिनाचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, समुद्रात पात लाटांच्या तडाख्यात पलटी झाल्याने पातीतील दोन्ही मच्छीमारानी थरार संघर्ष करत उलटलेल्या पातीवर उभे राहून आरडाओरडा केला. यावेळी लगतच २०० मीटर परीसरात मासेमारी करत असलेल्या बोटींच्या साह्याने त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले.