पालघर : शिवसेनेच्या शिववाहतूक सेनेने पालघर-मनोर रस्त्यावरील मच्छीविक्रेत्यांना हटविण्यासाठी घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेनेही बाजार हटविण्यासाठीचा ठराव घेतल्याने संतप्त झालेल्या शेकडो मच्छिमार महिलांनी आज मनसेच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेला घेराव घातला.नगर परिषदेला १८ वर्षे झाली तरी तिला साधे मच्छी व भाजी मार्केट उभारता आले नसल्याने मासे, भाजीपाला, फळविक्रेते मिळेल त्या जागेवर अनेक वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहेत. जुने मार्केट अनेक वर्षांपासून अपूर्ण पडून असल्याने महिला अनेक वर्षापासून मनोर रस्त्यालगत बसून मच्छीविक्री करीत आहेत. त्यामुळेच मनोर रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने त्यांना हटवावे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देणारे पत्र शिवसेनेच्या शिववाहतूक सेनेने पोलीस आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे सर्व किनारपट्टीवरून संतप्त भाव उमटले होते. ज्या शिवसेनेला किनारपट्टीवरील मच्छीमारांनी भरभरून मते देऊन तिचे आमदार, जिल्हापरिषद सदस्य निवडून दिलेत. अनेक ग्रामपंचायतींवर भगवा फडकविला. त्या मच्छीमार महिलांना पर्यायी जागा उपलब्ध करून न देता त्यांना हटविण्याचा निर्णय घेतल्याने सेने विरोधात संतप्त प्रतिक्रीया सोशल मिडियावर झळकू लागल्या आहेत.पालघर नगर परिषदेने ठराव करून हा बाजार हलविला जाणार असल्याचे कळल्या नंतर मच्छीविके्र त्या महिलांनी मनसेच्या नेतृत्वाखाली पर्यायी हक्काची जागा आणि सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून आंदोलन केले. या महिलांना जबरदस्तीने हटविण्याची प्रयत्न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असे शहराध्यक्ष सुनील राऊत यांनी नगराध्यक्षांना सांगितले. शिव वाहतूक सेनेशी शिवसेनेचा संबंध नसल्याचे सेना जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी मनसे शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी पालघर तालुकाध्यक्ष समीर मोरे, उपतालुकाध्यक्ष चेतन संखे,दिनेश संखे,शिवाजी रेम्बाळकर, संतोष पिंपळे, रत्नदीप पाखरे, तुलशी जोशी, उदय माने, राजेश शिंदे, हेमंत घोडकेंसह शेकडो महिलांनी नगरपरिषदेला घेराव घातला. यावेळी नगरपरिषदेच्या गेटला टाळे ठोकण्यात आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी रस्ता रोको केला. पर्यायी जागा दिल्या शिवाय त्यांना हटविण्यात येणार नाही असे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले. (प्रतिनिधी)
मच्छीविक्रेत्या महिलांचा पालिकेला घेराव
By admin | Published: January 18, 2017 3:41 AM