मनोहर कुंभेजकर
मुंबई - मत्स्यसंवर्धनासाठी ठाणे आणि मुंबईत येत्या १५ मे ते १५ आॅगस्ट (नारळी पौर्णिमा) या काळात मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या आज सकाळी वसईतील पाचूबंदर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला वसई, अर्नाळा, उत्तन, सातपाटी परिसरातील ५00 मच्छीमार उपस्थित होते. गुजरातमध्येही १५ मेपासून तेथील मच्छीमारांनी स्वयंप्रेरित होऊन मासेमारी बंदीचा निर्णय घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील आणि सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे मत्स्यप्रेमींना तीन महिने आपल्या जिभेचे चोचले पुरवता येणार नाहीत. शासनाच्या मत्स्य विभागाच्या आदेशानुसार राज्यात १५ जून ते १५ आॅगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी असतो. मात्र सततच्या मासेमारीमुळे जगात २०४७ साली समुद्रातील मत्स्यसाठाच संपेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मत्स्य प्रजोत्पानाच्या कालावधीत मत्स्यसाठ्यांचे जतन व्हावे आणि मासे अंडी घालताना त्यात बाधा येऊ नये या उद्देशाने ठाणे-मुंबईतील मच्छीमारांनी निर्णय घेतला असल्याची माहिती समितीचे चिटणीस रामकृष्ण तांडेल आणि मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. हा बंदीचा निर्णय शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाला कळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.