देगलूर (जि. नांदेड) :
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेत त्यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी अतिशय अवघड अशा तपासण्या करण्यात आल्या. पाच महिने चालणाऱ्या या संपूर्ण पदयात्रेत सहभागी होण्यासाठी देशभरातून २ हजार जण दिल्लीत दाखल झाले होते. मात्र, शारीरिक तपासणी, चालण्याची सवय या बाबींबरोबरच इतर कोणत्याही व्याधी नसलेल्या केवळ १२० जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये मराठवाड्यातून नांदेडचे डाॅ. श्रावण रॅपनवाड हे एकमेव ठरले आहेत.
ही निवड करताना कौटुंबिक पार्श्वभूमीसह फिटनेस, रक्तदाब, मधुमेह यासह इतर आजार या बाबींची दिल्लीत तपासणी करण्यात आली. त्यानंतर मुलाखत घेण्यात आली. जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांच्या दिल्लीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यात मराठवाड्यातून श्रावण रॅपनवाड हे एकमेव कार्यकर्ते निवडले आहेत.
पदयात्रेत सांगलीच्या डॉक्टरांची टीम पदयात्रेत सहभागी झालेल्या यात्रेकरूंच्या आरोग्याविषयी काही समस्या निर्माण झालीच तर त्याच ठिकाणी उपचार करता यावेत. याव्यतिरिक्त पदयात्रींचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने डॉक्टरांचे एक पथक आणि रुग्णवाहिकाही पदयात्रेत सज्ज आहेत. युवक काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाकडून या विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या यात्रेत सज्ज ठेवले आहे. सांगली येथून १० डॉक्टरांची टीमही सहभागी झाली आहे.
‘भारत जोडो’त राज्यातील नऊ जणांचा समावेशभारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेश आहे. त्यात मराठवाड्यातून एकमेव नांदेडचे श्रावण रॅपनवाड यांच्यासह रोहन लाल बिट्टू, मनिंदर सिंग वोरा, वैष्णवी भारद्वाज, नंदा म्हात्रे, आतिशा पैठणकर, सत्यम ठाकूर, मनोज कुमार उपाध्याय आणि पिंकी राजकुमार सिंग यांची भारत यात्री म्हणून निवड झाली आहे.
अशी आहे राहुल गांधी यांची दिनचर्या खासदार राहुल गांधी आणि यात्रेतील सहभागी सर्वांची दिनचर्या ही पहाटे साडेचार वाजता सुरू होते. साडेपाच वाजता ध्वजवंदन झाल्यानंतर यात्रेला सुरुवात होते. सकाळच्या सत्रात चालल्यानंतर दुपारच्या सत्रात विश्रांती असते. यावेळी राहुल गांधी हे बुद्धिवादी लोकांशी संवाद साधतात. विश्रांतीनंतर पुन्हा ही यात्रा सुरू होते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी ६ डॉक्टरांचे पथक आणि दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.