ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 13 - राज्यातील महत्वाच्या पाच शहारतील हेल्मेटसक्ती तुर्तास हटवण्यात आली आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत शहरांतील हेल्मेटसक्ती तूर्तास रद्द करण्यात आली. 15 जुलैपासून कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये शहाराअंतर्गत हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला सर्वपक्षीयांनी विरोध केला होता. त्याबाबत आज सर्वपक्षीयांनी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन, चर्चा केली. वाहनचालकांचं हेल्मेट वापरण्याबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून, हळूहळू सक्ती करण्याचं या बैठकीत ठरले आहे.
येत्या 15 जुलैपासून हेल्मेटसक्ती करण्याच्या पोलिसांच्या आदेशानंतर जिल्ह्यात त्याबाबत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महामार्गावर ठीक; पण शहरांत अशी सक्ती करणे व्यवहार्य ठरणार नाही, असे मत शेकडो नागरिकांनी व्यक्त केले होते. सर्वसामान्यांना वेठीस धरून, त्रास देऊन कोणतीही मोहीम राबविणार नाही, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही स्पष्ट केले.
कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये शनिवारपासून (ता. 15) हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक चांगलाच हडबडला होता. विविध प्रश्न आ वासून उभे असताना ही नवी "ब्याद" कशाला असा "मध्यमवर्गीय" प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता. सर्वसामान्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. शहरे व वाहनांना वेग नसतो अशा ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती अव्यवहार्य असल्याचे सर्वांचेच मत होते. यावेळी बोलता नांगरे पाटील म्हणाले, लोकांमध्ये प्रबोधन करून टप्प्याटप्प्याने त्यांना हेल्मेट वापरासाठी प्रवृत्त करण्याचा हा विषय आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही वाहतुकीच्या विषयावर काम करत आहोत. त्यातून 550 अपघात टळले, तर 280 जणांचे जीव वाचविण्यात यश आले. हे मोठे काम आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरवातीच्या टप्प्यात शाळा- महाविद्यालये, उद्योग-धंदे याठिकाणी जाऊन आम्ही प्रबोधन करणार आहोत. तेथील कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करणार आहे.