ऑनलाइन लोकमत
पुलगाव(वर्धा), दि. 23 - पक्षाशी बंडखोरी करून सत्तेकरिता विरोधी पक्षाशी हातमिळणवणी केल्याप्रकरणी येथील नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एका आदेशाद्वारे अपात्र घोषित केले. या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.अपात्र सदस्यांमध्ये नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह काँग्रेसचे राजीव बतरा, सुनील ब्राम्हणकर, स्मीता चव्हाण व सेनेच्या जयश्री बरडे यांचा समावेश आहे. हिंगणघाट नगर पालिकेच्या नगराध्यक्षासह सहा नगरसेवकांना अशाच कारणाने अपात्र व्हावे लागले होते. यानंतरची जिल्ह्यातील ही दुसरी मोठी अपात्रतेची कार्यवाही आहे.सन २०११ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे १०, अपक्ष ३ व सेना १ अशा १४ सदस्यांच्या गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करण्यात आली होती. परंतु, नगराध्यक्षांवर अविश्वासाचे सावट दिसताच नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह काँग्रेसचे राजीव बतरा, सुनील ब्राम्हणकर, स्मीता चव्हाण हे काँग्रेसचे चार व सेनेच्या जयश्री बरडे हे नगरसेवक नोंदणीकृत काँग्रेस व सहकारी पक्षाच्या अधिकृत गटातून बाहेर पडले. नंतर त्यांनी भाजपाच्या पाच नगरसेवकांशी हात मिळवणी करून सत्ता काबीज केली.यावर काँग्रेसचे गटनेता राजन चौघरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करून पक्ष व गटाशी बंडखोरी केल्याप्रकरणी त्या पाचही नगरसेवकांवर कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली होती. या याचिकेवर तत्कालिन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी महाराष्ट्र लोकल एॅथोरिटी मेंबर्स डिसक्वॉलिफीकेशन अॅक्ट १९८६ च्या कलम ७ यु.एस. १६ (आय.ए.) अन्वये दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतली. प्रकरण निर्णयाप्रत पोहचताच जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची चंद्रपूरला बदली झाली. अशातच पुलगाव दारूगोळा भांडारात अग्निस्फोट झाला. यामुळे निर्णय व्हायचा होता. परिणामी पाचही नगरसेवकांवर महिनाभरापासून अपात्रतेची टांगती तलवार होती.अखेर गुरुवारी या प्रकरणी जिल्हाधिकारी नवाल यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह या पाचही नगरसेवकांना अपात्र घोषित केले. नगर परिषद निवडणूक तोंडावर असताना काँग्रेस नगराध्यक्ष व नगरसेवकांना काँग्रेसकडून घरचा अहेर मिळाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.