ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 1 - अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीवर ताण असल्याने आषाढी यात्रेसाठी पाच कोटींचे यात्रा अनुदान देणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन व जनसंवाद सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री विजय शिवतारे, बबनराव लोणीकर, माजी आ. सुधाकरपंत परिचारक, खा. शरद बनसोडे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यावर्षी राज्यातील ४० हजार गावांपैकी २८ हजार गावे ही दुष्काळग्रस्त आहेत. मागील वर्षी २५ हजार गावात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याचे काम सरकार करीत आहे. दुष्काळी निधी, जलसंधारण, जलपुनर्भरण, जलस्वराज्य प्रकल्प असे इव्हेंट राबवून राज्यातून कायमचा दुष्काळ घालविण्याचा प्रयत्न सुरू आहे.राज्यात दीड वर्षापूर्वी १७ लाख शेतकरी विमा खातेदार होते. परंतु मागील दीड वर्षात खातेदार वाढवून आज १ कोटी १३ लाख शेतकऱ्यांना या विमा योजनेचे खातेदार केले. आघाडी सरकारने १५ वर्षात ४ कोटी रूपयांची मदत शेतकऱ्यांना केली. मात्र आम्ही एका वर्षात ४ हजार कोटींची विमा रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, असे बिंबवले जात आहे. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, हे विसरून चालणार नाही.अपूरे सिंचन प्रकल्प राबविण्यासाठी पाटबंधारे विभागाने १० हजार कोटी रूपयांची मागणी केली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून निधी मिळतो आहे. अपूर्ण प्रकल्प अडकणार नाहीत, मात्र आलेल्या पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे. ठेकेदारांची घरे भरण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प नाहीत. वेगळा प्रकार यासंदर्भात घडल्यास आपण त्याची गय करणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.यावेळी राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंढरपूरची दशा नीट करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. कामे मार्गी लावली जात आहेत. वारकऱ्यांना विठोबाचे दर्शन घडते. परंतु पंढरी दर्शन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात आम्ही नाही. मात्र शेतकऱ्यांना भक्कम उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आंबा, डाळिंब एक्सपोर्टसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न पाहिजेत. शेत मालावर प्रक्रिया केल्याशिवाय शेतकऱ्यांना प्रॉफीट मिळणार नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.कार्यक्रमास आ. बबनराव शिंदे, आ. सुभाष देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आ. नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महेश कोठे, माजी आ. सिद्रामप्पा पाटील, राजाभाऊ राऊत, युटोपियनचे प्रवर्तक उमेश परिचारक, अक्कलकोट बाजार समितीचे संजय शिंदे, उत्तम जानकर, सभापती संजय पाटील, धवलसिंह मोहिते-पाटील, सभापती पोपट रेडे, उपसभापती संतोष घोडके, संचालक लक्ष्मणराव धनवडे, तानाजी वाघमोडे, जि.प. सदस्य बाळासाहेब देशमुख, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, पंढरपूर दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब माळी, अॅड. संतोष देशमुख, माजी सभापती वसंतराव देशमुख, माणिक बनसोडे, राजेंद्र मिरगिणे, श्रीकांत देशमुख, विलास घुमरे, बापू जगताप, लक्ष्मण ठोंगे-पाटील, दादा साठे, माजी आ. धनाजी साठे, भगवान चौगुले, पांडुरंगचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, दाजी पाटील, दिलीप घाडगे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, सभापती वर्षाराणी बनसोडे, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सुकेशिनी देशमुख, जि.प. सदस्य बाळासाहेब माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. पी. कुलकर्णी, श्वेता हुल्ले यांनी केले. सुरेश आगावणे यांनी आभार मानले.
तोपर्यंत व्हॅट रद्द...भाजप सरकारने बेदाण्यावरील व्हॅट दीड वर्षापासून रद्द केला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आपला प्रयत्न आहे. जोपर्यंत भाजपाचे सरकार आहे, तोपर्यंत बेदाण्यावर व्हॅट लावला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.