जितेंद्र कालेकर,
ठाणे- बड्या कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांचे ई-मेल्स स्पूफिंग (बनावट ईमेल करणे) करून कंपनीच्या खातेप्रमुखाकडून पैसे उकळण्याचा प्रकार कर्नाटकमधील बंगलोर येथे नोंद झाला आहे. अनिल शर्मा नावाच्या भामट्याने अशाप्रकारे ठाणे, दिल्लीसह देशभरातील अनेक प्रमुख शहरांतील नामांकित कंपन्यांना सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. कर्नाटक आणि ठाणे पोलीसही त्याचा शोध घेत आहेत. बनावट ईमेल तयार करून शर्माने नामांकित कंपन्यांची आधी आर्थिक उलाढालीची माहिती काढली. त्यानंतर वित्त विभागाच्या प्रमुखाचा बनावट ईमेल तयार करून त्याद्वारे अकाऊंट सांभाळणाऱ्यांकडे चार ते पाच लाखांची मागणी केली. व्यवस्थापकीय संचालकाने (एमडी) तातडीने पैसे मागितल्याचा समज होऊन अनेक कंपन्यांच्या लेखाप्रमुखांनी संबंधित बँक खात्यांवर पैसे वर्ग केले. अशाप्रकारे दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, ठाणे, मुंबई परिसरातील अनेक कंपन्यांची त्याने फसवणूक केली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी ठाणे पोलिसांना दिलेल्या माहितीवरून गुन्हे अन्वेषण विभाग आणि सायबर सेलकडून या भामट्याचा शोध घेण्यात येत आहे.>फसवणूक टाळा‘कोणताही आॅनलाइन व्यवहार करण्यापूर्वी किमान फोनवर तरी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा अन्य खासगी व्यक्तिंनी खात्री करणे आवश्यक आहे. थेट कोणत्याही खात्यात पैसे टाकणे टाळल्यास अशी फसवणूक होणार नाही.’- विक्रांत पवार, संचालकसायबर आय कन्सल्टींग सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. , मुंबई. >बियाणे विक्रीच्या बहाण्यानेही फसवणूकया भामट्याने परदेशी बियाण्याची आॅनलाइन विक्री करण्याच्या बहाण्यानेही एकाची चार लाखांची फसवणूक केली आहे. धनलक्ष्मी एंटरप्रायजेस या नावाने आयडीबीआय बँकेत बचत खाते सुरू केले. त्यावर विरार (जिल्हा पालघर) येथील पत्ता दिला. हे खाते चार महिने चांगल्या प्रकारे हाताळत त्याच बँकेत चालू खाते सुरू केले. त्यानंतर आॅनलाइन बियाणे देण्याची जाहिरात देऊन अनेकांना या खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले. केवळ कर्नाटकच नव्हे तर दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई परिसरातील कंपन्यांची त्याने अशाप्रकारे फसवणूक केली आहे. त्याच्या फसवणुकीची संपूर्ण माहितीच कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी ठाणे पोलिसांना दिली आहे.