मिरज : राज्यात मिरजेत एकमेव असलेल्या तंतुवाद्य निर्मितीस राज्य शासनाने हस्तकलेचा दर्जा दिला असून लघुउद्योग विकास महामंडळातर्फे तंतुवाद्य कारागीरांसाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मिरजेतील शासनाच्या जागेत तंतुवाद्य कारागीरांना घरे व दुकाने बांधून देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी लघुउद्योग विकास महामंडळाच्याअधिकाऱ्यांनी शनिवारी शहरातील जागेची पाहणी केली. तंतुवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेत तंतुवाद्य निर्मिती कारागीरांची पाचवी पिढी या व्यवसायात आहे. तंबोरा व सतार या दर्जेदार तंतुवाद्यांसाठी मिरजेचा संपूर्ण देशात व परदेशात लौकिक आहे. तंतुवाद्याचा मधुर व सुरेल आवाज, टिकावूपणा, सुबकता यामुळे मिरजेतील सतार व तंबोऱ्यांना विविध मान-सन्मान मिळाले आहेत. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत कला टिकविण्याचे श्रेय तंतुवाद्य कारागीरांनाही आहे. मात्र विविध अडचणींमुळे मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती कारागीरांची संख्या घटली आहे. इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याच्या आक्रमणामुळे तंतुवाद्य निर्मिती व्यवसायाला मोठा फटका बसला. इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यांमुळे तंबोऱ्यांची मागणी घटली. तंतुवाद्यांची घटलेली मागणी, कच्च्या मालाच्या वाढत्या दरामुळे तंतुवाद्य कारागीरांची संख्या कमी होत आहे. तंतुवाद्य निर्मिती हे अत्यंत कष्टाचे काम आहे. महिन्याभरात केवळ चार ते पाच सतारी किंवा तंबोऱ्यांची निर्मिती होत असल्याने तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यामुळे कारागीरांची संख्या रोडावत आहे. कारागीरांची नवी पिढी या व्यवसायात येण्यास इच्छुक नाही. तंतुवाद्य कला टिकविण्यासाठी व संवर्धनासाठी तंतुवाद्य निर्मितीला हस्तकलेचा दर्जा द्यावा, कारागीरांना निवृत्तीवेतन, व्यवसायासाठी जागा, आर्थिक मदत व आरोग्य सुविधा देण्याच्या मागणीसाठी तंतुवाद्य कारागीरांचा शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. अखिल भारतीय हस्तकला महामंडळाने तंतुवाद्य निर्मितीस हस्तकलेचा दर्जा दिला. मात्र राज्य शासनाने हा दर्जा दिला नसल्याने शासकीय योजना व सवलतींपासून तंतुवाद्य कारागीर वंचित होते. आता लघुउद्योग विकास महामंडळाच्या अंतर्गत तंतुवाद्य निर्मितीस हस्तकलेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीताचा आधार असलेला तंतुवाद्य निर्मिती व्यवसाय टिकविण्यासाठी आता मदत मिळणार आहे. तंतुवाद्य निर्मिती व्यवसायाला कलेचा दर्जा मिळाल्याने तंतुवाद्य कारागीरांनी समाधान व्यक्त केले. कारागीरांना विमा, तंतुवाद्य निर्मात्यांना दुकाने व घरांसाठी शासनाची जागा उपलब्ध करून देऊन तंतुवाद्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मिरजेतील कोल्हापूर रस्ता, सावळी रस्ता व सांगली रस्त्यावरील एसटी वर्कशॉपजवळील शासनाच्या जागेत तंतुवाद्य कारागीरांना घरे व दुकाने बांधून देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाव शतकाचा लढादेशातील अनेक दिग्गज कलाकार मिरजेत तयार झालेल्या सतार व तंबोऱ्यांचा वापर करतात. मिरजेच्या सतार व तंबोऱ्यास परदेशातही मागणी आहे. सतार किंवा तंबोरा बनविण्यासाठी कोणी भोपळा कापतो, कोेणी तराफा जोडतो, कोणी तारा चढवितो, कोणी नक्षीकाम करतो, कोणी वाद्याचे ट्युनिंग करतो. सतार, तंबोऱ्याची निर्मिती ही सामूहिक कला आहे. वाद्याचे ट्युनिंग करणे किवा स्वर जुळविणे तर अत्यंत कौशल्याचे काम आहे. त्यासाठी स्वरांचे ज्ञान आवश्यक आहे. अशा खडतर काम करणाऱ्या या तंतुवाद्य कलाकारांना कलेचा दर्जा मिळविण्यासाठी सुमारे पाव शतक झगडावे लागले आहे.
मिरजेच्या तंतुवाद्य कारागीरांसाठी पाच कोटींचा निधी
By admin | Published: May 25, 2015 12:08 AM