विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी महिनाभरात येण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी तसे निर्देश राजपत्रित अधिकारी महासंघासोबतच्या बैठकीत दिल्याची माहिती महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी शुक्रवारी दिली. पाच दिवसांचा आठवडा केल्यास या पाच दिवसांत दर दिवशी कामाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवून देण्यास महासंघाच्या वतीने शासनाला अनुमोदन देण्यात आले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच दिवसांच्या आठवड्याचा प्रस्ताव मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे. आता मुख्यमंत्री कधी आणि कोणता निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे. पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करावे आणि सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा या सध्याच्या प्रमुख मागण्या आहेत. निवृत्तीचे वय वाढविण्यास अधिकारी महासंघाचा आग्रह असला तरी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी त्याचे समर्थन केलेले नाही.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा
By admin | Published: July 01, 2017 2:54 AM