नवी दिल्ली: दिल्ली फिल्म सोसायटीच्या संस्थापक व भारतीय चित्रपटसृष्टीतील बदलांच्या सुमारे पाच दशकांच्या साक्षीदार विजया मुळ (९८)े यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विजया मुळे यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले होते. इतिहास संशोधक, शिक्षणतज्ज्ञ असलेल्या विजया मुळे यांचे दूरचित्रवाणी विश्वात मोठे योगदान आहे.
विजया मुळे यांच्याच कल्पनेतून १९७४ साली ‘एक और अनेक एकता’ अॅनिमेटेड लघुपट साकारण्यात आला. सर्वोत्तम शैक्षणिक लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यातील ह्यएक चीडिया- अनेक चीडियाह्ण या गीताची सामान्यांवर मोहिनी होती. सेंटर फॉर एज्युकेशनल टेक्नॉलॉजीच्या प्रमुखपदी त्यांची १९७५ साली नियुक्ती करण्यात आली. एकाचवेळी देशातील २४०० गावांमध्ये त्यांनी तयार केलले शिक्षणपर लघुपट चार भागांमध्ये दिसत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते.
दी टिडल बोर या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. त्यासाठी विख्यात दिग्दर्शक सत्यजित रे, लुईस माले यांची मदत त्यांना मिळाली. माहितीपटांच्या विश्वात अतुलनीय कामगिरीचा सन्मान म्हणून विजया मुळे यांना २००२ व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आले.
विजया मुळे यांची मुलगी सुहासिनीदेखील अभिनेत्री आहेत. आईच्या निधनावर आपली भावना व्यक्त करताना सुहासिनी म्हणाल्या, वृद्धत्वामुळे होणारे आजार तिला कधी झालेच नाही. तिचा रक्तदाब, हृदयाची गती अत्यंत चांगली होती. मधुमेहही नव्हता. अगदी १० मे रोजी आईचा फोन आला होता. तिची तब्येत बरी नसल्याने आम्ही त्यांना एस्कॉर्ट रुग्णालयात नेले.