चंद्रपूर : पृथ्वीजवळून लहान-मोठे ५० धुमकेतू २०१७ या वर्षात जाणार असून पृथ्वीला प्रदक्षिणा करताना त्यापैकी काही धुमकेतू सूर्यावर आदळणार आहेत. मात्र, त्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. तसेच पाच धुमकेतू १४ जानेवारीपासून साध्या डोळ्यांनी वा दुर्बिणीने पाहता येतील.यावर्षी खगोलात मोठी ग्रहणे किंवा घडामोडी दिसणार नाहीत. मात्र, सूर्य व पृथ्वीजवळून जाणाऱ्या ५० धुमकेतूंपैकी अनेक धुमकेतू नियमित नाहीत. काही धुमकेतू सूर्यावर आदळणार आहेत, तर काही पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याने पृथ्वीकडे आदळण्याचे भय व्यक्त करण्यात येत होते. मात्र तसे होणार नसल्याचा निर्वाळा चंद्रपूर येथील स्कॉय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिला.आपल्या सूर्यमालेत २०० अब्ज धुमकेतू असण्याचा अंदाज आहे. त्यापैकी २०१६पर्यंत केवळ ४ हजार धुमकेतूंचा शोध लागला आहे. यंदा दिसण्याची शक्यता असलेल्या पाच धुमकेतूंपैकी धुमकेतू-सी/२०१६ हा निओवाईज या अवकाश निरीक्षण केंद्राने २१ आॅक्टोबर २०१६ रोजी शोधून काढला आहे. हा धुमकेतू पुढे हजार वर्षांनी पुन्हा पृथ्वीकडे येणार आहे. हा धुमकेतू पृथ्वीच्या उत्तर-पूर्व दिशेला १४-१५ जानेवारीच्या पहाटे सूर्योदयापूर्वी साध्या डोळ्यांनी दिसण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)पाच धुमकेतूंचे दर्शन वेळापत्रकदर तीन वर्षांनी येणारा २पी/एनके २० फेब्रुवारीपासून दुर्बीणीने शुक्र व मंगळ ग्रहाजवळ दिसू शकेल. त्यानंतर तो १० मार्चला पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने साध्या डोळ्यांनी दिसणार आहे. धुमकेतू ४५पी/होन्डा-मर्कस-पजदुस्कोव्हा मार्च महिन्यात उत्तर आकाशात दिसेल. तो ३० मार्चला पृथ्वीजवळ येईल. परंतु त्याला ते महिन्यात पाहता येईल. ४१पी/टुट्टल/जिएकोबिनी-क्रेसाक हा धुमकेतू उत्तर आकाशात ३० मार्च ते ३० एप्रिलपर्यंत दिसणार आहे. तर सी/२०१५व्ही२ (जॉन्सन) हा उत्तर गोलार्धातून मे महिन्यात साध्या डोळ्यांनी दिसेल. जून महिन्यात तो पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे.
यावर्षी दिसणार पाच धुमकेतू
By admin | Published: January 09, 2017 4:29 AM