चंद्रकांत गायकवाडतिसगाव (जि. अहमदनगर) :
स्पर्धेच्या युगातही धार्मिक सण, उत्सव सामूहिकपणे साजरे करण्याची परंपरा पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी गावाने मनस्वी जपली आहे. येथील हनुमान जयंती उत्सवाला पाचशे वर्षांची परंपरा आहे. लाल दगडातील कोरीव शिल्पाचे राज्यातील हे एकमेव मंदिर आहे.
चक्रवर्ती राजा हर्षवर्धनाने टाकळी नामक वनस्पतींचे जंगल असलेल्या या भूमीत मोठा महायज्ञ केल्याची आख्यायिका आहे. येथे समर्थ रामदास स्वामी यांनी सन १५७५ च्या सुमारास गोमयीन हनुमान मूर्तीची स्वहस्ते प्रतिष्ठापना केली आहे. नाशिकजवळील टाकळी गावासारखीच समर्थांनी स्थापित केलेली गोमयाची हनुमान मूर्ती (गायीच्या शेणापासून निर्मिती असलेली) व हनुमानाच्या नावाने परिचयास आलेले श्री क्षेत्र हनुमान टाकळी हे गाव राज्यातील एकमेव आहे. नाथ संप्रदायाचे अध्वर्यू संत मोरेश्वर, प. पू. माधवस्वामी या गुरुशिष्यांमुळे १९६९ च्या कालखंडानंतर या देवभूमीचे पौराणिक महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
मायंबापासून उगम पावणारी पवनागिरी, तर वृद्धेश्वरहून प्रवाही होणारी वृद्धा या दोन्ही नद्यांच्या संगमावर हे स्थान वसले आहे. पौराणिक काळाच्या मागोव्यानुसार येथील हनुमान जयंती उत्सवाला ५०० वर्षांची परंपरा असल्याचे दिसून येते.
विदेशात महती- समर्थ हनुमान देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष माधवस्वामी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर येथील मंदिर जीर्णोद्धार आरंभ केला. भरतपूर बयाणा येथील बन्सीपहाड नामक लाल दगडातील कोरीव शिल्पाचे हे काम प. पू. रमेशआप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आता कळसाकडे सुरू आहे. - अमेरिकेतील समर्थ भक्त शंकर पंडित यांनी रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ इंग्रजीमध्ये भाषांतरित केला. त्या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर टाकळीच्या गोमयीन हनुमान मूर्तीचे छायाचित्र वापरले आहे. त्यामुळे या स्थानाची महती देश-विदेशात गेली आहे.