मुंबई : भौतिकशास्त्र विषयाची कसोटी लावणारी ४७ वी भौतिकशास्त्र आॅलिम्पियाड स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके प्राप्त करीत पाच भारतीय विद्यार्थ्यांनी नाव उंचावले आहे. यात मुंबईच्या प्रिय शहाचा समावेश असून, त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.भौतिकशास्त्रावर दरवर्षी भौतिकशास्त्र आॅलिम्पियाड स्पर्धा घेण्यात येते. यंदा स्पर्धेचे ४७ वे वर्ष होते. ही स्पर्धा ११ ते १७ जुलै या कालावधीत स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे पार पडली. स्पर्धेत ८४ देशांतील तब्बल ३९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात भारतातील पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यातील थेअरी परीक्षेसाठी ‘मशिन्स’, ‘नॉन लाइनर इलेक्ट्रिकल सिस्टीम’ आणि ‘मॉडर्न फिजिक्स’ यावर प्रश्न विचारण्यात आले. तर प्रयोगासाठी ‘रेझिस्टिव्हिटी आॅफ थिन शीट्स आॅफ मटेरिअल’ विषय देण्यात आला होता. या परीक्षांना सामारे जात पाच विद्यार्थ्यांनी तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके प्राप्त केली. यात प्रिय शहा (मुंबई), देवादित्य प्रामाणिक ( कोलकाता), गौवथम अम्रित्य (हैदराबाद) यांना सुवर्णपदक, तर दिव्यांश गर्ग (जयपूर), मनन भाटिया (लखनऊ) यांना रौप्यपदक प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)
भौतिकशास्त्र आॅलिम्पियाडमध्ये पाच भारतीय विद्यार्थ्यांची बाजी
By admin | Published: July 21, 2016 2:44 AM