ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १८ - आश्रमशाळेतील गैरप्रकाराचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या कॅमेरामन आणि वृत्तवाहिनीच्या महिला वार्ताहरांसह पाच जणांवर संस्थाचालकाने हल्ला चढवला. त्यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. कॅमेरा फोडला आणि पत्रकारांचे वाहनही जाळण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला घडवून आणणारा श्रीकृष्ण मते या आश्रमशाळेचा अध्यक्ष असून, तो रासपचा जिल्हाध्यक्ष आहे. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे पत्रकार जगतासह सर्वत्र प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. हिंगण्याजवळच्या उखडी येथे अहल्यादेवी होळकर आश्रमशाळा आहे. या शाळेत ४०० मुले आणि १५६ मुली शिकत असल्याचे सांगितले जाते. संस्थाध्यक्ष श्रीकृष्ण मते जास्त पटसंख्या दाखवून अनुदान लाटतो. अन्नधान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तूत घोळ करतो. त्याचप्रमाणे शाळेत अनेक गैरप्रकार चालतात अशी तक्रारवजा माहिती मिळाल्याने आयबीएन लोकमतच्या वृत्तसंकलक सूरभी शिरपूरकर, कॅमेरामन प्रशांत मोहिते, सुनील लोंढे, महाराष्ट्र नंबर-१ या वृत्तवाहिनीचे ब्युरोचीफ गजानन उमाटे आणि कॅमेरामन सौरभ होले वृत्तसंकलनासाठी आश्रमशाळेत गेले. ते आपले कर्तव्य बजावत असतानाच मते, त्याचा मुलगा आणि अन्य साथीदारांनी पत्रकारांना शिवीगाळ सुरू केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी कॅमेरे हिसकावून सर्वांना मारहाण सुरू केली. स्वत:चा बचाव करणाऱ्या या पत्रकारांनी पळू नये म्हणून आरोपी मते आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचे वाहनही जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची वार्ता उपरोक्त पत्रकारांनी अन्य सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर हिंगणा पोलिसांनाही कळविण्यात आले. या घटनेचे वृत्त सर्वत्र वायुवेगाने पसरले. त्यानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पत्रकार हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले असता आरोपी मतेसुद्धा आपल्या साथीदारांसह पोलीस ठाण्यात पोहचला. त्याने उपरोक्त पत्रकारांविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार नोंदवली. माहिती कळताच पोलीस उपायुक्त राकेश कलासागर हिंगणा ठाण्यात पोहचले. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनीही घटनेची माहिती जाणून घेतली. मतेंची पक्षातून हकालपट्टी... दरम्यान, पत्रकारांवरील या हल्ल्याची माहिती वायुवेगाने सर्वत्र पोहचली. त्यानंतर चोहोबाजूने निषेधाचा सूर उमटला. रासपचे अध्यक्ष तसेच राज्याचे पशूसंवर्धन व दुग्धोत्पादन राज्यमंत्री महादेव जानकर यांना ही माहिती कळताच त्यांनी रासपच्या जिल्हाध्यक्षपदावरून मतेची हकालपट्टी केल्याची माहिती महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष माधुरी पालीवाल यांनी पत्रकारांना दिली. पोलीस आयुक्तांना शिष्टमंडळ भेटले...या हल्ल्याचा निषेध नोंदवत उपराजधानीतील ईलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन यांनी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांची भेट घेतली. हल्ला झालेल्या पत्रकारांनी त्यांना झालेला घटनाक्रम सांगून मते आणि त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. मते आणि त्याचा मुलगा तसेच साथीदार राजकीय घोंगडे ओढून गुंडगिरी करीत असल्याचेही लक्षात आणून दिले. आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, मतेच्या आश्रमशाळेत अनेक गैरप्रकार घडले आहेत. अधीक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मतेविरुद्ध दुखापतीचा तर त्याचा मुलगा मुकेश याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही दाखल आहे.