अमरावती : महिनाभरापूर्वी मांजरखेड रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अनुप जवळकार यांच्या आत्महत्येचे गूढ आता उकलू लागले आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्यात आत्महत्येला यवतमाळमधील पाच न्यायाधीश जबाबदार असल्याचे म्हटले असल्याची तक्रार अनुप जवळकार यांच्या भावाने चांदूररेल्वे पोलिसांत नोंदविली आहे. तथापि, यासंबंधी पोलिसांनी मात्र याबाबत अनभिज्ञता दाखविली.यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर या पदावर कार्यरत अनुप जवळकार यांचा मृतदेह ६ मार्चला चांदूरलगतच्या मांजरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळ आढळला होता. ते ज्या शासकीय निवासस्थानात राहत होते, तेथील घरगुती साहित्य पुण्याला नेण्यासाठी त्यांचे बंधू अमोल जवळकार १ एप्रिलला आले होते. त्यावेळी त्यांना तेथे एक जुने पाकीट आढळले. त्यात अनुप जवळकार यांच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी होती आणि त्यामध्ये पाच जणांची नावे नमूद आहेत. हे पाचही जण यवतमाळ जिल्ह्यातील न्यायाधीश आहेत.या चिठ्ठीत उल्लेख केलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी तक्रार अमोल जवळकार यांनी चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात नोंदविली.
आत्महत्येला पाच न्यायाधीश जबाबदार!
By admin | Published: April 05, 2016 2:24 AM