नितीन अग्रवाल / नवी दिल्लीकर्ज आणि दुष्काळाने जेरीस आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य सरकार गायी देणार असल्याचे महादेव जाणकर यांनी सांगितले. पुढील वर्षात शेतकऱ्यांना पाच लाख गायी देण्यासह त्यांचा चारा आणि उपचाराची व्यवस्थाही राज्य सरकारकडून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी येथे दिली. गायींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडेल, असेही ते म्हणाले. दुधाच्या विक्रीसाठीही राज्य सरकारने व्यवस्था केली आहे. गायींची योग्य देखभाल आणि दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना कौशल्यविकास मंत्रालयाच्या सहकार्याने प्रशिक्षित करण्यात येत असून, जवळपास दीड लाख शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेत आहेत. राज्य सरकारच्या या योजनेसाठी आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर यांच्याकडून प्रगत जातीचे बैल मिळणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दिल्लीत आलेले जानकर गुरुवारी ‘लोकमत’शी बोलत होते. या योजनेमुळे राज्यातील दुग्धोत्पादन वेगाने वाढेल. काही वर्षांतच राज्य दुधाबाबत स्वयंपूर्ण होईल तसेच लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दुधाची गरज भागविण्यासाठी राज्याला अमूलकडून दररोज लाखो लीटर दूध खरेदी करावे लागते. मात्र, महाराष्ट्राचा स्वत:चा ब्रॅण्ड ‘आरे शक्ती’ही राष्ट्रीय पातळीवरील अमूलसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करील. केंद्र सरकारच्या उपक्रमानांही दूध पुरविण्याची राज्याची योजना आहे. गोरेगावमध्ये दुग्धविकास शास्त्र पीडी कॉलेज आणि औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये मत्स्य कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव आपण केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना दिला आहे. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही जानकर म्हणाले.
शेतकऱ्यांना पुरविणार पाच लाख गायी
By admin | Published: February 17, 2017 3:34 AM