परतवाडा (अमरावती) : बिबट्या शिकार प्रकरणात वनविभागाने २५ जानेवारीला दोन शिकाऱ्यांना जेरबंद केले होते. चौकशीदरम्यान अन्य तीन आरोपींना पकडण्यात आले. वन्यजीव गुन्हे शाखा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व पूर्व मेळघाट (प्रादेशिक) यांनी ही कारवाई करून बिबट्याची कातडी व अन्य साहित्य हस्तगत केले आहे.चिखलदरा तालुक्यातील मोथा येथील रंगलाल बावणे बिबट्याचे कातडे विकण्याच्या तयारीत असल्याची २५ जानेवारी रोजी वनविभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांतच वनविभागाने सापळा रचून आरोपींना घटांग ते खामला रस्त्यावर मुद्देमालासह ताब्यात घेतले. याप्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. वनविभागाने आरोपी रंगलाल बावणे व मनोहर तांदळीकर यांना अटक करून अचलपूर न्यायालयात हजर केले होते. दोन्ही आरोपींनी बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली असून चौकशीदरम्यान वनविभागाने पंढरी उर्फ पंडा मधू शनवारे याला परतवाडा येथील जगदंबा चौकातून, तर गणेश नामदेव पाटील याला नवाखेडा येथील शेतातून ताब्यात घेतले. तसेच सुरेश सायबू बावणे याला वाघडोह येथून ताब्यात घेतले. या तिघांना ८ दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बिबट्या शिकारप्रकरणी पाच जण जेरबंद
By admin | Published: January 30, 2017 3:45 AM