लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करून त्यांना पंजाबहून पॅरिसला पाठविणाऱ्या टोळीतील आणखी पाच जणांना गुरुवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पाचही जण हे सिनेक्षेत्रात पडद्यामागील कलाकार आहेत. सलिम डे अरीया, जोगेंदर सिंग, सोहेल शेख, संजय परदेशी आणि मोहम्मद रफिक मेहमुद अली शेख अशी आरोपींची नावे असून, न्यायालयाने त्यांना १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.हे पाचही जण गोरेगाव, अंधेरी, नालासोपारा, माहीम या भागांतील रहिवासी आहेत. गुन्हे शाखेच्या जबरी चोरी दरोडा विरोधी पथकाने मानवी तस्करीचे हे जाळे उधळून लावले. या प्रकरणात आरिफ फारुकी (३८), राजेश पवार, फातिमा अहमद या तिघांना यापूर्वीच अटक केली होती. त्यापाठोपाठ सुनील नंदवानी (५३), नरसैया मुंजली (४५) या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्यांच्यासह दक्षिण मुंबईतील रफिक पांचाळला बेड्या ठोकल्या. या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच वरील पाच आरोपींची नावे समोर आली होती. त्यानुसार त्यांना अटक केली. या पाच जणांनी आतापर्यंत अनेक मुलांना परदेशात रवाना केले आहे. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
कबुतरबाजीत आणखी पाच जणांना बेड्या, बॅकस्टेज कलाकारांचा समावेश
By admin | Published: May 12, 2017 2:22 AM