- व्यंकटेश वैष्णव, बीड
जिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर पाच रुग्णांची दृष्टी अधू झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या पाचही रुग्णांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, परंतु त्यांना दृष्टी लाभणार किंवा नाही, याबाबतचे चित्र रविवारी स्पष्ट होणार आहे.परभणी, वाशिम जिल्ह्यात यापूर्वी असाच प्रकार घडला होता, त्याची पुनरावृत्ती बीडमध्ये झाली. रुग्णांच्या डोळ्यांना ‘सुडो मोनॉस’ या बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्याने दृष्टी धोक्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून काळजी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे समजते. गुरुवारी रात्री जिल्हा रुग्णालयात पाच रुग्णांची दृष्टी शस्त्रक्रियेनंतर अधू झाली. पहिल्यापेक्षाही दृष्टी कमजोर झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक भयभीत झाले. याचा बोभाटा होण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने त्यांना अधिक उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात हलविले. याबाबत रुग्णालय प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे. माहिती घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. या रुग्णांच्या डोळ्यावर पुन्हा शस्त्रक्रिया केल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. मुंबईहून चौकशी समिती बीडकडे रवानाया प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने एक चौकशी समिती नेमण्यात आली असून, रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य संचालक मोहन जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रुग्णांची नावेसुभद्रा भोसले (रा. माजलगाव), मालनबाई जगदाडे (रा. केज), भागूबाई विघ्ने (रा. माजलगाव), विठ्ठल कोल्हे (रा. डोंगरकिन्ही), भानुदास विघ्ने (रा. माजलगाव)