ठाणे : दिवा परिसरातील एका शेतात विषारी रसायन ओतून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या जमीनमालकासह पाच जणांना शीळ-डायघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत रसायनांचे १५८ ड्रम जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी. काटकर यांच्या पथकाने जमीनमालक राजेश जयराम पाटील (३९) यांच्यासह त्या ठिकाणी रसायन डम्पिंग करणारे मेहबूब खान, सलमान खान, अखतर खान आणि शकील खान या पाच जणांना अटक केली. घटना घडली तेव्हाच ९ डिसेंबर रोजी राजेशला ताब्यात घेण्यात आले होते. अधिक चौकशीत १० ते १६ डिसेंबरदरम्यान उर्वरित चौघांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध घातक रसायन ओतून नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचविणे, या कलमांसह पर्यावरण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली त्या वेळी ५८ आणि चौकशीनंतर दहिसर मोरी येथून १०० रसायनाचे ड्रम जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजेशने ही जमीन सलमान खानसह चौघांना काही दिवसांच्या भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र, यात कोणताही कागदोपत्री व्यवहार झाला नव्हता. ते त्यापोटी किती भाडे घेत होते, हे मात्र उघड होऊ शकलेले नाही. (प्रतिनिधी)
दिवा डम्पिंगप्रकरणी पाच जणांना अटक
By admin | Published: December 28, 2015 3:53 AM