सिल्वासा/ मुंबई : दादरा- नगर हवेलीमधील सिल्वासा येथे मधुबन धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. तर २० जण बचावले. हे सर्व पर्यटक महाराष्ट्रातील होते.खानवेल शहरातील दुधनी रिसॉर्टमध्ये हे पर्यटक आले होते. या रिसॉर्टच्या मालकाने ही बोट नुकतीच विकत घेतली होती व पहिली सैर करण्यासाठी मुंबई व महाराष्ट्रातील नातेवाईक, मित्र परिवाराना निमंत्रित केले होते, असे दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. बोटीत २५ पर्यटक होते. त्यापैकी २० जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने वाचविले. या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्यांची नावे अशी, सुनीता कोठारी (६५), बिपीन शाह (६०), पन्नाबेन शाह (५५), पल्लवी शाह (६५) व वीणा कमल भोला (५४) सुनीता कोठारी या ‘लोकमत सखी मंच’च्या अध्यक्षा आशू दर्डा, पुण्याच्या अमिता मुनोत आणि इंदूरचे प्रसिद्ध सीए राजेंद्र मेहता यांच्या भगिनी आहेत. सुनीता कोठारी यांच्या पश्चात पती सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रेम कोठारी, मुलगा मनिष कोठारी व मुलगी स्नेहल रुणवाल असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी मुंबईतील बाणगंगा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा, लोकमत मीडियाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आमदार मंगलप्रभात लोढा, जिनेंद्र मुनोत, कांतीलाल कोठारी, मफतराजजी मुनोत, सुभाषजी रुणवाल यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांनी कोठारी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. चर्नी रोड येथील बिर्ला मातोश्रीमध्ये गुरुवारी सायंकाळी ५.३० ते ७ या दरम्यान प्रार्थना सभा होणार आहे. (प्रतिनिधी)
सिल्वासा येथे बोट उलटून पाच पर्यटकांचा मृत्यू
By admin | Published: March 30, 2017 4:35 AM