सातारा / वाई : बारामतीहून मांढरदेव येथे देवदर्शनासाठी आलेल्या चव्हाण कुटुंबीयांना घरातील विष्णू नारायण चव्हाण (वय ४७, रा. श्रीरामनगर, बारामती) या कुटुंबप्रमुखानेच विष दिल्याचे समोर आले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडला असून, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.बारामती येथील श्रीरामनगरमधील चव्हाण कुटुंबीय बुधवार, दि़ २६ रोजी दुपारी मांढरदेव येथे देवदर्शनाला आले होते़ तेथे दुपारी चार वाजता वडील विष्णू चव्हाण यांनी तीर्थ म्हणून दिलेले पाणी पिल्याने स्वप्नील विष्णू चव्हाण (वय २३) याला जोरदार थंडी वाजून आली. उलट्या व तोंडाला फेस आला़ त्यानंतर कुटुंबातील इतर सर्व लोकांना त्रास होऊ लागला. चालक भीमसेन जाधव याने उपचारासाठी सर्वांना वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ तेथे स्वप्नील याला सायंकाळी पाच वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले़विष्णू चव्हाण यांची पत्नी सुनीता (वय ४५), मुलगी तृप्ती (१६) आणि प्रतीक्षा (२०) व आई मुक्ताबाई नारायण चव्हाण (६०) यांनाही विषबाधा झाली होती. त्यांना सुरुवातीला वाई ग्रामीण रुग्णालयात व नंतर सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतीक्षा हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.एका मांत्रिकाने प्रसाद दिल्याचे सुरुवातीला पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी मुली आणि आईकडे चौकशी केल्यावर वडील विष्णू चव्हाण यांचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना बारामतीमधून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच विष्णू चव्हाणने मुलगा, दोन मुली, पत्नी आणि आईला आपणच विष दिल्याचे कबूल केले.त्याच्यावर खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
वडिलांनीच तीर्थ म्हणून दिले पाच जणांना विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 3:46 AM