आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील वाकीशिवणे येथील ओढयाच्या पाण्यात पाच जण बुडाल्याची घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़ मात्र यातील दोघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे़ या दोघांवर सांगोला ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ या घटनेची सविस्तर माहिती अशी की, रामचंद्र खाजुबा चव्हाण (वय १५) हा मुलगा गाव ओढ्याच्या पाण्यात पोहचण्यासाठी गेला होता़ यावेळी खाजु चव्हाण हे मासे पकडण्यासाठी गेले होते़ यावेळी खाजु चव्हाण हे बुडत असताना सदाशिव पांडूरंग कांबळे हे त्यास वाचविण्यासाठी ओढ्याच्या पाण्यात उतरले होते़ त्याचवेळी सदाशिव कांबळे हे बुडत असल्याचे दिसताच महादेव पांडूरंग कांबळे हे त्यास वाचविण्यासाठी पाण्यात उतरले़ मात्र पाण्याचा वेग व भोवरा तयार झाल्याने हे तिघेही बुडाले़ दरम्यान, रामचंद्र चव्हाण हा मुलगा भितीपोटी गावात येऊन घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली़ पप्पू चव्हाण व मुन्ना कुमार हे त्या तिघांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरले़ मात्र हेही दोघे बुडत असल्याचे दिसताच ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले़ या दोघांवर सांगोला ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ घटनास्थळी आ़ गणपतराव देशमुख, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, तहसिलदार संजय पाटील, सभापती मायांका यमगर, जि़प़सदस्य अॅड़ सचिन देशमुख यांनी भेट देऊन विचारपूस केली़ बुधवारी सायंकाळी सांगोला परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे़
सांगोल्यातील पाच जण पाण्यात बुडाले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 5:21 PM