- जयंत धुळपअलिबाग : दिवेआगर सुवर्णगणेश मंदिर दरोडा आणि दोन खून प्रकरणांत जिल्हा न्यायालयातील मकोका विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर पेठकर यांनी १२ दोषींपैकी पाच जणांना आजन्म कारावासाची, तीन महिला आरोपींना १० वर्षे सक्तमजुरीची तर चोरीचे सोने विकत घेणा-या दोघा सोनारांना नऊ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दोन आरोपींना दोषमुक्त करण्यात आले असून, सुवर्णगणेशाचे पोलिसांनी परत मिळवलेले सोने सरकारजमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.नवनाथ विक्रम भोसले (३२, रा. घोसपुरी,अहमदनगर), कैलास विक्रम भोसले (२९, रा. घोसपुरी, अहमदनगर), सतीश जैनू काळे उर्फ छोट्या (२५, बिलोणी, औरंगाबाद), विजय काळे (२८, श्रीगोंदा, अहमदनगर), ज्ञानेश्वर विक्रम भोसले (३४, घोसपुरी, अहमदनगर) या पाच जणांना कलम ३९६ अन्वये दरोडा टाकताना खून केल्याबद्दल न्यायालयाने आजन्म कारावासाची व प्रत्येकी ५०० रुपये दंड तर कलम ३९७ अन्वये चोरीच्या गुन्ह्यासाठी सात वर्षे जन्मठेप व प्रत्येकी ५०० रु पये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद शांताराम पाटील यांनी दिली. तर खैराबाई विक्रम भोसले (५६, घोसपुरी, अहमदनगर), कणी राजू काळे उर्फ कविता (४४, हिरडगाव, श्रीगोंदा, अहमदनगर) आणि सुलभा शांताराम पवार (५६, श्रीगोंदा, अहमदनगर) या तीन महिला आरोपींना कलम ३९६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंड आणि कलम ३९७ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली असून, या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.दरोड्यात चोरलेल्या सुवर्णगणेशाच्या मूर्तीचे सोने घेणारे आनंद अनिल रायमोकर (३८, बेलंवडी, श्रीगोंदा, अहमदनगर) व अजित अरुण डहाळे (२८, श्रीगोंदा, अहमदनगर) या दोघांना कलम ४१२ अन्वये दरोड्यातील मुद्देमाल घेतल्याबद्दल नऊ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंड आणि कलम २०१ अन्वये गुन्ह्यातील पुरावा नष्ट केल्याबद्दल सहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली असून, दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.या प्रकरणातील आरोपी गणेश विक्रम भोसले आणि विक्रम हरिभाऊ भोसले या पिता-पुत्रांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या दोघांच्या वतीने अॅड. देवराव डहाळे व अॅड. एस. बी. व्यवहारे यांनी काम पाहिले. उर्वरित १० आरोपींना आर्थिक परिस्थितीमुळे वकील करणे अशक्य होते. वकिलाअभावी त्यांना त्यांची बाजू न्यायालयात मांडता आली नाही असा अन्याय त्यांच्यावर होऊ नये याकरिता महाराष्ट्र न्याय सेवा विधि प्राधिकरणाने अॅड. जी. एन. डंगर, अॅड. मानसी म्हात्रे आणि अॅड. महेश गुंजाळ यांच्याकडे या १० आरोपींचे वकीलपत्र दिले होते.शिक्षा वाढीसाठी अपीलकरणार - पाटीलसुवर्णगणेशाच्या मूर्तीवर दरोडा टाकून दोन निष्पाप सुरक्षारक्षकांचा निर्घृण खून करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा होता. ‘रेअरेस्ट आॅफ दि रेअरेस्ट’ अशा या गुन्ह्यात आरोपींना कलम ३९६ अन्वये फाशीची शिक्षा द्यावी असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान आणि सोमवारी निकालपूर्व अंतिम सुनावणीतही केला होता, असे नमूद करत आरोपींच्या शिक्षेत वाढ होण्याकरिता तसेच ‘मकोका’अंतर्गत शिक्षा होण्याकरिता अपील दाखल करण्याची विनंती आपण शासनास करणार असल्याचे सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी सांगितले. या खटल्याची सुनावणी २८ डिसेंबर २०१५ रोजी विशेष मकोका न्यायाधीश किशोर पेठकर यांच्या न्यायालयासमोर सुरूझाली. सरकार पक्षाच्या वतीने एकूण १०४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले.पाच वर्षांच्या कालावधीअंती निकालरायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुप्रसिद्ध सुवर्णगणेश मंदिरावर २४ मार्च २०१२ रोजी रात्री ८.00 ते २५ मार्च २०१२च्या सकाळी ६.१५ वाजण्याच्या दरम्यान दरोडा पडला. मंदिराचे पहारेकरी महादेव गोपाळ घडशी आणि अनंत बापू भगत या दोघांचा लोखंडी पहारींनी खून करून सुवर्णगणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार रु पयांचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये १२ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. पाच वर्षांनंतर खटल्याचा सोमवारी निकाल लागला.
दिवेआगर दरोड्यातील पाच जणांना जन्मठेप, दुहेरी खून खटला : ३ महिलांना १० वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 5:30 AM