धारूर - बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चारदरी येथे शनिवारी सायंकाळी वीज पडून पाच जण ठार झाले. माजलगाव तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण सहा ठार झाले. पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या दहा जणांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये पाच जण जागीच ठार झाले तर पाच गंभीर भाजले. दुस-या घटनेत माजलगाव तालुक्यातील एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी या दुर्देवी घटना घडल्या. जखमींवर धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आसाराम रघुनाथ आघाव (२८), उषा आसाराम आघाव (२५), दिपाली मच्छींद्र घोळवे (२१), शिवशाला विठ्ठल मुंडे (२१), वैशाली संतोष मुंडे (२५) अशी वीज कोसळून ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सुमन भगवान तिडके (४५), रुक्मिण बाबासाहेब घोळवे (५२), कुसाबाई नामदेव घोळवे (४५), सिताबाई दादासाहेब घोळवे (२५), सुरेखा आबासाहेब आघाव (१७) हे गंभीर भाजले आहेत. या जखमींवर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत . दरम्यान, हे सर्वजण शेतात बाजरी काढण्याचे काम करीत होते. पाऊस आल्याने त्यांनी झाडाचा आडोसा घेतला होता. याचवेळी ही दुर्देवी घटना घडली.
दरम्यान, शनिवारी माजलगाव, धारूर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस पडत असलेल्याने आडोसा म्हणून झाडाखाली थांबलेल्या या सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
माजलगावात महिला ठारमाजलगाव तालुक्यातील लोणगाव शिवारात शेतात काम करणा-या राधाबाई दामोधर कोळसे (५५) महिलेचाही वीज कोसळून मृत्यू झाला.