लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात रुग्णसंख्येने ११ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, एकूण रुग्णसंख्येत सध्या आॅक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पाच टक्के आहे. याखेरीज, राज्यात रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ९२ टक्के रुग्ण लक्षणेविरहित, सौम्य लक्षणे असलेले आहेत. तर तीन टक्के रुग्ण गंभीर स्थितीत आहेत.
राज्यातील एकूण मृत्यूंमध्ये ६५ टक्के मृत्यू पुरुष रुग्णांचे तर ३५ टक्के महिला रुग्णांचे आहेत. एकूण रुग्णांमध्ये ६१ टक्के प्रमाण पुरुषांचे असून ३९ टक्के प्रमाण महिला रुग्णांचे आहे. मुंबई पालिकेच्या आकडेवारीनुसार, १७ सप्टेंबरपर्यंत १ हजार २६५ रुग्ण गंभीर असून आयसीयूमध्ये १ हजार ५८३ रुग्ण आहेत. त्याचवेळी आॅक्सिजनवर ५ हजार ९१९ रुग्ण असून व्हेंटिलेटरवर १ हजार ५ रुग्ण आहेत. आॅक्सिजन-व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा आकडा वाढल्याने साहजिकच आॅक्सिजनची मागणीही मुंबईत काही प्रमाणात वाढली आहे. संपूर्ण मुंबईत एक लाख लीटरपेक्षा अधिक आॅक्सिजन लागत आहे, यात सरकारी, पालिका, खासगी रुग्णालये आणि कोविड सेंटरचा समावेश आहे.पालिका रुग्णालये-कोविड केंद्रांचा विचार केल्यास पालिकेकडे अडीच लाख लीटर इतका आॅक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. वरळी, बीकेसी, नेस्को-गोरेगाव, दहिसर (दोन सेंटर), मुलुंड आणि अन्य एका ठिकाणीअशी सात कोविड केंद्रे कार्यरत आहेत.
सर्व केंद्रांना आॅक्सिजनचा तुटवडा होऊ नये यासाठी दूरदृष्टीने सातही सेंटरमध्ये टर्बो अर्थात आॅक्सिजनच्या मोठ्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. १३ हजार आणि २६ हजार लीटरच्या या टाक्या असून काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन टाक्या बसवल्या आहेत. रुग्णालयातही टाक्या आणि सिलिंडरची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेकडे आता अडीच लाख लीटरचा साठा उपलब्ध असून यातील २० टक्केच आॅक्सिजन लागत आहे. त्यामुळे ८० टक्के साठा शिल्लक राहत असल्याचेही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.रायगडमध्ये ५५४ नवे कोरोना रुग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी २० सप्टेंबर रोजी ५५४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ५३२ वर पोचली आहे. दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण ११०४ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, ३४ हजार ६१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.शनिवारी दिवसभरात पनवेल महापालिका क्षेत्रात २१२, पनवेल ग्रामीणमध्ये ४६, उरण २३, खालापूर ३६, कर्जत २५, पेण ४३, अलिबाग ६९, मुरुड ३, माणगाव २९, रोहा ३६, सुधागड २, श्रीवर्धन २, म्हसळा ७, महाड १४, पोलादपूर ७ असे एकूण ५५४ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १९२, पनवेल ग्रामीण ६०, उरण ७, खालापूर ३५, कर्जत २७, पेण ५६, अलिबाग १००, मुुरुड २३, माणगाव ३६, रोहा ६३, सुधागड १, म्हसळा ४, महाड २८, पोलादपूर ५ असे एकूण ६३७ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.