नाशिक: आताच्या घडीला देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा माहोल आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक नजरा या उत्तर प्रदेश आणि गोवा यातील निवडणुकांवर असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकते, या शब्दांत चव्हाण यांनी निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे. त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो. देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवाचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली असून, लोकं बेरोजगार झाले आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाषणबाजी करतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाषणबाजी करतात, त्यांना केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत, देशाकडे मोदींचे लक्ष नाही, असा घणाघात करत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मुंबई महापालिका निवडणूकही काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काही तडजोडी करून महाविकास आघाडी तयार केली. चंद्रकांत पाटील भाजप किती लवकर सत्तेत येते, याची स्वप्न पाहत आहेत, त्यांनी स्वप्न बघत रहावी, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. ते टीव्ही९ शी बोलत होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर, गोव्यात उत्पल पर्रिकर यांच्यासंदर्भात राजकारण केंद्रीत झाले असून, उमेदवारी नाकारल्याने उत्पल यांच्यासह अनेक भाजप नेते, आमदार, मंत्री, कार्यकर्ते यांनी बंडखोरी करत पक्षाला रामराम केला आहे.