लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या अवर्षण प्रवण क्षेत्रात सिंचन सुविधा मिळावी, यासाठी पाच उपसा सिंचन योजनेसाठी ६२१.६८ कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.तापी नदीवर मौजे पाडळसे गावाजवळ निम्न तापी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे ५०२.०९ दलघमी एवढा पाणी साठा होणार असून ६३ हजार ५६५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालात या प्रकल्पात लाभधारक शेतकऱ्यांनी वैयक्तिक अथवा सामूहिक पद्धतीने स्वत:च्या खर्चाने पाणी उपसा करून शेतीसाठी वापरण्याची तरतूद आहे. मात्र तसे करणे शक्य नसल्याचे निर्दशनास आल्यानंतर या प्रकल्पाच्या क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविण्यासाठी पाच उपसासिंचन योजना राबविण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय जल आयोगानेही या क्षेत्रात उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी पुरविण्यासाठी मंजुरी दिली होती, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.या योजनेमुळे प्रामुख्याने अमळनेर, धरणगाव, चोपडा या अवर्षण प्रवण क्षेत्रातील २० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधेचा लाभ होणार आहे. निम्न तापी प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असून त्यावेळी या सिंचन योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.या पाच सिंचन योजना पूर्णत: नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचित करण्यात येणार असून या योजनांसाठी तत्वत: मान्यता मिळाल्यामुळे आता सर्वेक्षण व इतर अनुषांगिक गोष्टी सुरू करण्यात वेग येणार आहे.
निम्न तापीच्या लाभक्षेत्रात पाच उपसासिंचन योजना
By admin | Published: June 21, 2017 2:38 AM