पुणे : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पाच परदेशी तरुणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) चौकशी करण्यात आली. एटीएसच्या पथकाने शनिवारी सकाळी सातच्या सुमारास कोंढव्यातील कौसरबागेमधील एका इमारतीमध्ये छापा मारुन या तरुणांना ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले. त्यांना रविवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसरबागेतील वास्तव्यास असलेल्या काही परदेशी तरुणांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. महिनाभरापासून पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवून होते. शनिवारी सकाळी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यासोबतच घर मालक आणि काही ओळखीच्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. परभणीमधून इसिसशी असलेल्या संबंधामुळे एका तरुणाला अटक केल्यानंतर मुंबईचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. एटीएसच्या कार्यालयामध्ये या तरु णांची दुपारपर्यंत कसून चौकशी सुरु होती. (प्रतिनिधी)येमेनचे रहिवाशी व्यावसायिक व्हिसावरचौकशी सुरु असलेले तरुण येमेन या देशाचे रहिवासी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते व्यावसायिक व्हिसावर भारतामध्ये आलेले आहेत. त्यांचे शिक्षण येमेनमध्येच पूर्ण झालेले असून व्यवसायानिमित्त पुण्यात आल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले. केवळ एटीएसच नाही तर गुप्तचर विभागामार्फत (आयबी) त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
इसिसच्या संशयावरुन पाच तरुण ताब्यात
By admin | Published: July 17, 2016 5:10 AM