मुंबई : एसटी महामंडळात सध्या साडेसात हजार चालकांची भरती केली जात असतानाच, आता नवीन वाहकांच्या भरती प्रक्रियेचे नियोजनही केले जात आहे. पुढील वर्षी पाच हजार वाहकांची भरती केली जाणार असल्याचे, एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले, तर २0१५ च्या डिसेंबरमध्ये अधिकारी आणि पर्यवेक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. राज्यात एसटीचे ३६ हजार ४00 वाहक आहेत, तर सध्या १ हजार ४00 वाहकांच्या रिक्त जागा आहेत. त्यातच पुढील वर्षात एप्रिल, मे महिन्यापर्यंत जवळपास दोन हजार वाहक निवृत्त होत आहेत आणि त्यानंतर आणखी काही वाहकही निवृत्तीच्या वाटेवर आहेत. एकूणच पुढील वर्षात वाहकांच्या रिक्त जागांची संख्या वाढत असल्याने, पाच हजार नवीन वाहकांची भरती करण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून सुरू आहे. साधारण २0१६ च्या मार्चपासून वाहकांच्या भरती प्रक्रियेचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे, २0१५ च्या डिसेंबर महिन्यात अधिकारी आणि पर्यवेक्षकांचीही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यात अधिकारी पदाच्या ७0 आणि ३00 पर्यवेक्षकांची भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिकारी पदासाठी आणि शेवटच्या आठवड्यात पर्यवेक्षकांच्या भरतीचे काम होईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एसटीत पुढील वर्षी होणार पाच हजार वाहकांची भरती
By admin | Published: November 23, 2015 2:16 AM