मुंबई : राज्य सरकार कापसाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत देईल, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. सोयाबीन उत्पादकांनाही मदत जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.
भाजपचे हरिश पिंपळे, आदी सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, यशोमती ठाकूर, किशोर जोरगेवार, राजेश एकडे, आदी सदस्यांनी कापूस उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावर्षी कापूस खरेदीला विलंब केला जाणार नाही. दिवाळीपूर्वी खरेदी सुरू करण्यात येईल. आखूड धाग्याच्या कापसाला ७,१२१ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला ७,५२१ क्विंटलमागे भाव दिला जाईल, असे मंत्री सत्तार म्हणाले. शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये किमान उत्पादन खर्च येतो, मग पाच हजार रुपये हेक्टरी मदत देऊन काय होणार, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी केला.
पेरण्या वाढल्याराज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणे वाढ झाली असून राज्यात आतापर्यंत ६८ टक्के अर्थात ९६ लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरिपातील महत्त्वाच्या सोयाबीन व कापूस पिकांची देखील पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून सोयाबीनचे क्षेत्र ९१% तर कापूस पिकाखालील क्षेत्र ७६% पेरणी झाली अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी दिली.