समीर देशपांडे कोल्हापूर : मातांना पहिल्या प्रसूतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ १ जानेवारी २०१८पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणा-या महिला वगळता सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहतील. विशेष म्हणजे २०१७मध्ये पहिली प्रसूती झालेल्या माताही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.गेल्याच वर्षी भारतातील अन्य राज्यांमध्ये केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना सुरू करण्यात आली. मात्र महाराष्ट्रामध्ये ही योजना महिला व बालकल्याण विभागाने राबवायची की आरोग्य विभागाने राबवायची याचा निर्णय लवकर झाला नाही. अखेर ही योजना आरोग्य विभागाने राबविण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यानुसार नियोजनही सुरू झाले आहे.अधिकाधिक गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी नोंद करावी. त्यानिमित्ताने त्या महिलेचे आरोग्य कार्ड तयार व्हावे आणि प्रसूतीनंतर बाळाला आवश्यक त्या सर्व लसी दिल्या जाव्यात, हे उद्देश ठेवून ही योजना भारतभर लागू करण्यात आली आहे. तिची अंमलबजावणी आता महाराष्ट्रात होणार आहे.अगदी खासगी रुग्णालयातही प्रसूती झाली तरी त्या मातेला हे अनुदान मिळणार आहे. मात्र पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात नोंद करून आरोग्य कार्ड तयार करून घेणे बंधनकारक राहणार आहे.>तीन टप्प्यांत मिळणार पैसेगरोदर मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळणार एक हजार रुपये.आधार कार्ड, बॅँकेच्या खात्याची माहिती दिल्यानंतर १८० दिवसांनंतर मिळणार दोन हजार रुपये.प्रसूतीनंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री झाल्यानंतर मिळणार दोन हजार रुपये.
पहिल्या प्रसूतीवेळी मातांना पाच हजार रुपये, १ जानेवारीपासून अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:13 AM