- लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/पुणे : सूर्य आग ओकू लागल्याने विदर्भ होरपळत असून पाच जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उष्णतेमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४६.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. राजस्थानकडून येणाऱ्या शुष्क आणि उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. उपराजधानी नागपूरातील पाराही ४५.५ अंशापर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ उष्माघाताची पहिली घटना अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात उघडकीस आली. नामदेव दौलत खोब्रागडे (४०, रा. कामनापूर) असे मृताचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यातील बेडगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत मुख्य रस्त्यावरील घाटात कुंवरसिंह हलामी (६५, ककोडी, जि. गोंदिया) हे मृतावस्थेत आढळले. चंद्रपूर जिल्ह्यात गेवरा येथे जलसंधारणाच्या कामावरील शशिकला नागोसे (५५, रा. बोरमाळा) यांचा मृत्यू झाला. तर यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथे बैराम जयराम गेडाम (३०, रा. अडेगाव, ता. झरी) या युवकाचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्याच्या मोहगाव (करडी) पादंन येथे रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील मजूर मंजुळा रतिराम राखडे (६२, रा. मोहगाव) यांचा उष्माघाताने सकाळी मृत्यू झाला. - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस झाला़ येत्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.- पुणे ३७़९,अहमदनगर ४१़५, जळगाव ४३़७, कोल्हापूर ३६़१, महाबळेश्वर २९़९, मालेगाव ४१़८, नाशिक ३७़४, सांगली ३८, सातारा ३८़६, सोलापूर ४१़८, मुंबई ३५़२, अलिबाग ३५़२, रत्नागिरी ३३़८, पणजी ३४़३, डहाणू ३५़२, उस्मानाबाद ४०़७, औरंगाबाद ४०़२, परभणी ४३़५, नांदेड ४३़५, अकोला ४३़६, अमरावती ४२़६, बुलडाणा ४०, ब्रह्मपुरी ४५़५, चंद्रपूर ४६़८, गोंदिया ४५़१, नागपूर ४५़५, वाशिम ४२़६, वर्धा ४५, यवतमाळ ४३़५़