ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - पनवेलमध्ये अनाथाश्रमात पाच गतीमंद मुलींवर बलात्कार करणाऱ्या व एक खून करणाऱ्या रामचंद्र करंजुले याची फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सत्र न्यायालयाने करंजुले हा समाजासाठी कलंक असल्याचे म्हणत फाशी दिली होती तर अन्य पाच जणांना दोन ते 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती.
रामचंद्र करंजुले या अनाथाश्रमाचा संचालक असून सामूहिक बलात्कारामुळे क्षयरोगाने त्रस्त असलेल्या एका मुलीने प्राण गमावला होता. त्यामुळे त्याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती.
समाजासाठी करंजुले हा त्रास असून त्याच्यासाठी जन्मठेप अपुरी असल्याचे खालच्या न्यायालयाने म्हटले होते. मात्र, उच्च न्यायालयाने खूनासाठी असलेले 302 हे कलम वगळून खुनाचा प्रयत्न 307 या कलामाखाली गुन्हेगार शिक्षेस पात्र असल्याचे ठरवत करंजुलेची फाशीची शिक्षा रद्द केली व त्यास 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. कळंबोलीतल्या कल्याणी महिला बालसेवा संस्थेमध्ये हा घृणास्पद प्रकार घडला होता. एक मुलगी गतीमंद होती तर दोन मुली मूक व बधीर होत्या. त्यांनी खाणाखुणा करून घडलेला प्रकार सांगितला व मुख्य आरोपीस ओळखले. या प्रकरणी सत्र न्यायालयाने खंडू कसबे, प्रकाश खडके, सोनोली बदाडे, पार्वती मावळे आणि नानाभाऊ करंजुले यांनाही गुन्हेगार घोषित करत दोन ते 10 वर्षांची शिक्षा दिली होती.