बुलडाणा: राज्यात दोन तीन महिन्यात सत्तांतर होण्याचे वक्तव्य भाजपचे नेते करत असले तरी आघाडी सरकारची पाच वर्षे पूर्ण होतील; पण यांचे तीन महिने संपणार नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आ. रोहीत पवार यांनी बुलडाणा येथे रविवारी केले. भाजपला सध्या त्यांचे १०५ आमदार जपून ठेवत असल्याचे वक्तव्यही त्यांनी येथे केले. बुलडाणा येथे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी ते आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आ. रोहीत पवार म्हणाले की, शेतकरी हिताच्या विरोधातील भाजपची प्रवृत्ती आहे. दिल्लीत ज्या प्रमाणे शेतकऱ्यांवर पाण, लाठी आणि बळाचा वापर केला तो चुकीचा आहे. कोरोनामुळे जेव्हा सर्वत्र लॉकडावून होते तेव्हा शेतकरी शेतात राहबत होता. त्याच शेतकऱ्याच्या हिताला बाधा पोहोचेल असे जाचक कायदे भाजपच्या केंद्रातील सरकारने केले. त्यातून भाजपची प्रवृत्ती दिसते असे ते म्हणाले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांचे सरकार अस्तित्वात आले. हा बदल राजकीयदृष्ट्या नवीन होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्याचे आश्चर्य अनेकांना वाटले, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करून व समन्वयातून मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले.
बिहारमधील निवडणुकात आपण प्रचारासाठी गेलो नव्हतो तर एक युवा आपण आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते. त्यातून तेथे आपण गेलो होता. बिहारमध्ये प्रचारातात एक विरुद्ध ३० हेलिकॉफ्टर होते. भाजप मित्र पक्षांचीच ताकद कापणार हे निश्चित होते. भाजपने ते केले. ती त्यांची प्रवृत्ती असल्याचे ते म्हणाले. यासह अनेक बाबींचा त्यांनी यावेळी उहापोह केला.