रहिम दलाल - रत्नागिरी -गेली पाच वर्षे शिक्षक भरतीवर घालण्यात आलेली बंदी न उठविल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक विकासावर त्याचा परिणाम होत आहे. डी. एड. भरतीच नसल्याने जिल्ह्यात असंख्य डी.एड. धारक बेरोजगार आहेत. शिक्षक म्हणून नोकरी मिळत नसल्याने साहजिकच डी. एड्. ला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे डी. एड्. महाविद्यालयेही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात प्रथम आला. मात्र, या जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत चालली आहे. कारण जिल्ह्याच्या शैक्षणिक विकास साधणाऱ्या शिक्षण विभागामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या पदांवर प्रभारी काम करीत आहेत. पटसंख्या पडताळणीची धडक मोहीम राज्यभरात राबविण्यात आली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एखाददुसरे उदाहरण वगळता बोगस पटसंख्या नसल्याचे समोर आले होते. शिक्षणाच्या कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्याही असली पाहिजे. मात्र, गेल्या पाच वर्षा शिक्षक भरतीच झाली नसल्याने शासनाच्या या धोरणाचा बोजवारा उडाला आहे.जिल्हा परिषदेच्या २७00 प्राथमिक शाळा असून, सुमारे ८ हजार २०० शिक्षक आहेत. यामध्ये जिल्ह्यात आज १५० शिक्षक कमी असून ४० शिक्षक जिल्हा बदलीच्या तयारीत आहेत.डी.एड., बी.एड. याबरोबरच टीईटी व सीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यानाच शिक्षक पदावर नियुक्ती करण्यात येते. सन २०१० पासून सीईटी परीक्षाच झालेली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीही होणार नसल्याचे निश्चित आहे. स्थानिकांना शिक्षक भरतीमध्ये ७० टक्के प्राधान्य द्यावे, असा ठरावही जिल्हा परिषदेच्या वर्षभरापूर्वीच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. मात्र, पुढे शिक्षकांची भरती झाल्यास या ठरावाचा शासन कितपत विचार करेल, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. त्याचबरोबर शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी जिल्ह्यातील डी.एड. धारकांनी तत्कालीन शिक्षणमंत्र्यांचीही भेट घेतली होती. इतर कामांचा ताण तसेच बदल्यांबाबतचे नवीन धोरण याला कंटाळून अनेक शिक्षक स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.डीएडधारकांसाठी टीईटी परीक्षेचा मार्ग काटेरीविद्यार्थी अडचणीत : उर्दूचा निकाल ०.१८ टक्केरत्नागिरी : डी. एड्. पदवी धारण केलेल्या उमेदवारांना आता सहजासहजी शिक्षकाची नोकरी मिळणार नाही. त्यासाठी शासनाकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा म्हणजे डी.एड्.धारकांच्या नोकरीच्या मार्गावर काटे पसरलेले असल्याप्रमाणे आहे. डी.एड्.साठी दोन वर्षे घालविल्यानंतर शिक्षकाच्या नोकरीसाठी शासनाने टीईटी द्यावी लागत आहे. डी.एड्. झालेले असले तरी ही परीक्षा दिल्याशिवाय नोकरी लागणे मुश्किल आहे. त्यासाठी या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मराठी, इंग्रजी आणि ऊर्दू या तिन्ही माध्यमासाठी राज्यभरात घेण्यात आली होती. त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी शिकविणाऱ्यांसाठी आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत शिकविण्यासाठी तयार असलेले डी.एड्.धारक या परीक्षेला बसले. ही परीक्षा राज्यभर झाली. राज्यभरातून उर्दू माध्यमाचे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी १६,५७० विद्यार्थी देणार होते. त्यापैकी १५,९९१ विद्यार्थी परीक्षेला हजर तर ५६८ विद्याथी अनुपस्थित होते. या परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला. मराठी माध्यमाचा निकाल १.१३ टक्के आणि इंग्रजी माध्यमाचा निकाल ०.३५ टक्के निकाल लागला. इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या या परीक्षेला बसलेल्या ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल ०.१८ टक्के लागला. त्यामुळे ५८२७ विद्यार्थ्यांपैकी केवळ १० विद्यार्थीच शिक्षक नोकरीसाठी पात्र ठरले. यामध्ये मराठी माध्यमाचा निकाल ५.२५ टक्के आणि इंग्रजी माध्यमाचा १.०६ टक्के निकाल लागला. या निकालावरुन राज्यातील डी.एड. पदवी मिळालेल्या ४१४८३०र् ंपैकी ९५९३ डी.एड्. धारक उत्तीर्ण झाले. त्यामुळे उर्वरित डी.एड्.धारकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. (शहर वार्ताहर)अनेक इच्छुकांची गोची शिक्षक भरतीला शासनाचा खो असल्याने डी.एड.धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असली तरी मागील तीन वर्षामध्ये डी. एड. कॉलेजकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही कॉलेजही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी केवळ डी.एड. या पदवीवर शिक्षक म्हणून नोकरी मिळत होती. आता शासनाने शिक्षकाची नोकरी मिळविण्याच्या रस्त्यावर काटे पेरले आहेत.शिक्षक नोकरी मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी) द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीण झालेल्या डी. एड. धारकांनाच शिक्षकाची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांची गोची झाली आहे.डी. एड. महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावरमागील पाच वर्षांपासून शिक्षक भरती बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी डी.एड. पदवीकडे पाठ फिरवली. गेल्या दोन वर्षांपासून डी.एड. कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात एकूण ११ डी.एड. कॉलेज आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाची १० आणि उर्दू माध्यमाच्या एकमेव कॉलेजचा समावेश आहे. काही वर्षापूर्वी ज्या शासकीय डी.एड. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची रांग लागत होती. आता ते कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर आहे.
पाच वर्षे शिक्षक भरतीला ओहोटीच
By admin | Published: June 25, 2015 11:05 PM