नागपूर- कधी कधी सरकारची पोल कशी खुलते याचे मासलेवाईक उदाहरण सोमवारी विधानसभेत पहायला मिळाले. आवर्जून वाचाव्या अशा अनेक गमती आणि गंभीर गोष्टी प्रश्नोत्तराच्या पुस्तिकेत होत्या. त्यात अनेक प्रश्न रस्ते आणि त्यावरील खड्डे यांच्याशी संबंधित होते. एका प्रश्नाचे उत्तर देताना ग्रामविकास विभागाने अजब उत्तर दिले. एका प्रश्नाच्या उत्तरात ‘‘सन २०१२-१३ पासून ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ग्राम विकास विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. अशा प्रकारचे निवेदन फेब्रुवारी २०१८ मध्ये जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहे’’ असे लेखी सांगितले गेले. याचा पहिला अर्थ मंत्रालयात २०१२-१३ साली घेतलेला निर्णय जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचण्यास २०१८ साल उजाडले. दुसरा प्रश्न निघतो की या मधल्या काळात हे रस्ते कुणी दुरुस्त केले? की केलेच नाहीत, की केले असतील तर त्यांचा खर्च कुणी केला? मात्र हे सगळे विचारण्याची वेळच आली नाही, कारण प्रश्नोत्तराचा तासच गोंधळात संपून गेला... बिचारे रस्ते, त्यांचा मालक कोण, याच शोधात एवढी वर्षे राहिली.गोंधळ करायचा नाही असं ठरलंय ना...विधानसभेत विरोधक मुख्यमंत्र्यांना फारसे अडचणीत आणत नाहीत असे कायम बोलले जाते. त्याची प्रचिती सोमवारी आली. दुधाच्या प्रश्नावरून सभागृहात गोंधळ झाला. अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली आणि कामकाज पूर्ण करायचे ठरले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलता बोलता विरोधकांची फिरकी घेतली. ‘‘आपलं ठरलंय ना, की तुम्ही आम्हाला सहकार्य करणार ते... आज कोणती चार विधेयकं काढायची ते तुम्हीच सांगा, पण या आठवड्यापासून गोंधळ न करता काम करायचं आपलं ठरलयं मग आता काम करू...’’ असे मुख्यमंत्री म्हणताच सभागृहात हास्याची खसखस पिकली पण विरोधी बाकावरून कुणीही त्यावर काहीच बोलले नाही... आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाले...!सगळे जागेवर बसून घ्या...!दुधाच्या प्रश्नावरून विधानसभा १० मिनिटासाठी तहकूब झाली. पुन्हा कामकाज सुरु झाले त्यावेळी तालिका अध्यक्ष सुहास साबणे अध्यक्षांच्या आसनावर आले. त्यावेळी विरोधी बाकावरील सदस्य आपापल्या जागेवर शांत बसून होेते. तरीही तालिका अध्यक्ष म्हणू लागले, जागेवर बसा... जागेवर बसा..., कुणी उभेच नाही तर जागेवर बसायचे कुणी असा प्रश्न पडलेला असतानाच अध्यक्षांच्या आसनाच्या मागे असणाऱ्या दरवाज्यातून विरोधी पक्ष नेते हातानेच विरोधी बाकावरील सदस्यांना उभे राहा, असे खुणावू लागले... ते पाहून विरोधक पुन्हा घोषणा देत अध्यक्षांकडे गेले. मात्र त्यांच्या घोषणांचा आवाज सभागृहात विरून जाण्याच्या आतच तालिका अध्यक्षांनी सभागृह पुन्हा १० मिनिटांसाठी तहकूब करून टाकले...मुख्यमंत्री, एवढा ताण कशाला घेता...?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी दुपारनंतर दिल्लीला जायचे होते. तोच संदर्भ घेत राष्टÑवादीचे नेते अजित पवार विधानसभेत बोलताना म्हणाले, मुख्यमंत्रीजी, राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन विविध कामे याशिवाय तुम्हाला दिल्लीला जायचे असल्याने तिकडचेही काम तुमच्या डोक्यावर आहे. किती ओढाताण करता. तुम्ही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे का जबाबदारी सोपवत नाही? का तुमचा कुणावर विश्वास नाही का? असा सवाल पवार यांनी करताच सभागृहात हंशा पिकला. विधानसभेत चर्चेच्या दरम्यान कामकाज पत्रिकेतील विधेयकांची भरमसाठ संख्या दाखवत पवार म्हणाले, तुमच्या काही जबाबदाºया इतरांना दिल्यास त्यांनाही काम मिळेल आणि तुमचाही भार हलका होईल. मात्र तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही का? असा मिश्किल सवाल केला. त्याला उत्तर देण्यासाठी तावडे उभे राहणार तोच अजित पवारांच्या तिरकस बोलण्याने त्यांनी जागेवरच बसणे पसंत केले. मुख्यमंत्र्यांनी मात्र या मुद्याला स्पर्शही न करता आपले म्हणणे मांडून टाकले.