ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ : अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये इंग्रजीतील आॅरोन म्हणजेच मराठीतील धनगड ऐवजी धनगर अशी दुरूस्ती करण्याची मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेने आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांकडे केली आहे. तसे न केल्यास राज्यघटना अवमान अधिनियमाप्रमाणे विभागाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिला आहे.पाटील म्हणाले की, अनुसूचित जमातीच्या इंग्रजी आणि मराठी यादीत तफावत आढळत आहे.
राज्यघटनेच्या कलम ३४२ परिशिष्ट ९ यादी क्रमांक ३६ वर आॅरोन, धनगड म्हणजेच धनगर आहे. इतर जमातींप्रमाणे याबाबतही स्पेलिंगमध्ये दुरूस्ती करून राज्यातील जिल्हाधिकारी व प्रांतअधिकारी कार्यालयांना सवरा यांनी आदेश देण्याची गरज आहे. जेणेकरून धनगर बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळू शकतील. तसे केले नाही, तर सवरांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयात करू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.