मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 03:11 PM2021-01-26T15:11:00+5:302021-01-26T15:15:15+5:30
यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.
मुंबई/पुणे - भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहन केले. यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर ध्वजास सलामी देणारे पोलीस पथक, ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले.श्रीमती रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.ध्वजास सलामी देणारे पोलिस पथक, ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/0QtETA9CYv
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 26, 2021
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक एस चोक्कलिंगम, सहकार आयुक्त अनिल कवडे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तसेच पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली.
आज 'प्रजासत्ताक दिना'निमित्त पुण्यात शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानात ध्वजारोहण समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सन्मानचिन्ह तिरंग्याला मानवंदना दिली. राष्ट्रसेवेत एकनिष्ठतेनं कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव केला.#RepublicDaypic.twitter.com/VmHekPumOx
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 26, 2021
यावेळी वीरमाता व वीरपत्नींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या वतीने पोलीस विभागाला देण्यात येणारी वाहनेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस विभागाला सुपूर्द करण्यात आली.
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण -
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने शानदार संचलन केले.
पालकमंत्री भुजबळ यांनी कोरोनाशी लढा देऊन स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्व यंत्रणांचे अभिनंदन करून विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. या वेळी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह अन्य आधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यवतमाळमधील दिग्रस येथील BSNL कार्यालयाला ध्वजारोहणाचा विसर -
मंगळवारी देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) कार्यालयाला या ध्वजारोहणाचा जणू विसर पडला. आज या कार्यालयात ध्वजारोहण झालेच नाही. विशेष असे, हे कार्यालय आज उघडलेच गेले नाही. यामुळे दिग्रसकर नागरिकांत या कार्यालयाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.