सांगली : आॅस्ट्रेलियातील मेलबर्नच्या क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीच्या तरुणांनी गर्दी केली होती. तिरंग्यासह भगवा ध्वज फडकावून त्यांनी भारतीय संघाच्या विजयी जल्लोषात सहभाग घेतला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रंगत आता वाढत आहे. भारतीय संघाच्या सातत्यपूर्ण विजयामुळे भारतीयांच्या उत्साहाला उधाण आले आहे. यात सांगलीकरही मागे नाहीत. सांगलीतील विरेंद्र यड्रावे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी थेट आॅस्ट्रेलिया गाठले. मेलबर्न क्रिकेट मैदानावर त्यांनी हजेरी लावतानाच अस्सल सांगली, कोल्हापूर स्टाईलमध्ये तिरंगा व भगवा ध्वज फडकवत जल्लोष केला. प्रत्येक षटकागणिक वाढत जाणाऱ्या जल्लोषात सांगलीकरांचाही आवाज घुमत होता. सामन्याच्या सुरुवातीपासून सामना संपेपर्यंत मैदानात एकमेव भगवा झेंडा फडकताना पाहून आॅस्ट्रेलियातील मराठी बांधवांमध्ये उत्साह संचारला. अनेकांनी या तरुणांची आस्थेने चौकशी केली. सामना संपल्यानंतर मैदानाबाहेरही त्यांनी जल्लोष केला. मेलबर्नमध्ये सांगलीच्या तरुणांनी जल्लोष केल्याचा आणि भगवा फडकविल्याची छायाचित्रेही गेली दोन दिवस सोशल मीडियावरून फिरत आहेत. (प्रतिनिधी)मेलबर्न क्रिकेट मैदानावर सांगलीतील तरुणांनी असा जल्लोष केला.
मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर फडकला सांगलीकरांचा झेंडा
By admin | Published: March 03, 2015 10:32 PM