- लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा (जि. नंदुरबार) : पाणी भरण्यावरून बुधवारी दुपारी येथे झालेल्या वादाचे पर्यावसान थेट हाणामारीत झाले. त्यानंतर पालिकेचे नगरसेवक व बांधकाम सभापती सद्दाम सलीम तेली (३८) यांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली.पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने खेतीया रोडवर जाळपोळ आणि दगडफेक केली. दगडफेकीत डीवायएसपींसह चार पोलीस जखमी झाले आहेत. तेली यांच्यावर हल्ला करणारा संशयित शहादा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मुख्तार शेख यांचा मुलगा आहे. गरीब नवाज कॉलनीत बुधवारी दुपारी पाणी भरण्यावरुन वाद झाला. शहादा पालिकेच्या नगरसेविका सय्यद सायराबी लियाकत अली यांचा मुलगा सय्यद नासिदअली लियाकत अली व सय्यद मुजफ्फर लियाकत अली यांना माजी नगरसेवक शेख मेहमूद शेख अहमद व माजी उपनगराध्यक्ष शेख मुख्तार शेख अहमद यांच्या मुलांनी मारहाण केली होती़ त्यात नासीद व मुजफ्फर हे दोघे जखमी झाले. त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम सलीम तेली हे दवाखान्यात पोहचले. जखमींची चौकशी करत असतानाच त्याठिकाणी मुख्तार शेख यांचा मुलगा शेख प्रेम शेख मुख्तार हा चार ते पाच जणांसह तेथे आला़ त्याने थेट सद्दाम तेली यांच्या कमरेत तीक्ष्ण हत्यार खुपसले़ त्यात सद्दाम तेली हे जागेवरच कोसळले़ त्यांना तात्काळ नंदुरबार येथे हलवण्यात आले़ दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.